फोटो : एक्स (@airnews_mumbai)
महाराष्ट्र

सोलापुरात पावसाचा हाहाकार; ढगफुटीसदृश पावसामुळे नदी-नाल्यांना पूर, राष्ट्रीय महामार्ग ठप्प

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोलापूर शहराला अक्षरश: तडाखा दिला. गेल्या २४ तासांपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Swapnil S

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोलापूर शहराला अक्षरश: तडाखा दिला. गेल्या २४ तासांपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे तसेच शाळांना एका दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसल्याने अनेक भागांत पाणी साचले. अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्र नगर, शेळगी या भागांत तर २ ते ३ फूट पाणी घरात शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांना बुधवारची रात्र पाण्यात उभे राहून जागून काढावी लागली. अनेक ठिकाणी घरगुती साहित्य, विजेची उपकरणे पावसाच्या पाण्यामुळे खराब झाली.

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर येथील ओढे तुडुंब भरून वाहू लागल्याने नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सोलापूर शहराला लागून असलेल्या होटगी गावचा संपर्क तुटला आहे. लघु पाटबंधारे विभागाचा होटगी तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने ओढ्यावरून पाणी वाहू लागले आहे.

सोलापूरमधील २५६ गाळा परिसरात ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो होऊन दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे लोकांना रात्रभर जागून काढावी लागली. महानगरपालिकेचे कर्मचारी तातडीने ड्रेनेज सफाईसाठी उतरले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बसे आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मित्रनगर-शेळगी भागाची पाहणी केली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शहरात मागील २४ तासांत ११८.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी टॉवेल आणि विडी कारखान्यांमध्ये ५ ते ६ फूट पाणी साचल्यामुळे लाखो रुपयांचा माल पाण्यात वाहून गेला आहे. घरातील धान्य, कपडे आणि इतर सामानदेखील पूर्णपणे भिजून खराब झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा नालेसफाई व पाणी निचऱ्याची मागणी केली होती; मात्र वेळेत उपाययोजना न झाल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आर्थिक मदतीचे आयुक्तांकडून आश्वासन

सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी केली. घरांमध्ये पाणी शिरलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. सुरक्षिततेच्या दृष्टीने शहराच्या पूर्व भागातील शाळांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.

Mumbai : उद्यापासून एलफिन्स्टन पूल बंद; दक्षिण मुंबईत होणार वाहतूककोंडी; अनेक मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल

लहान समाजात जन्मलो हे पाप आहे का?भुजबळांचा उद्विग्न सवाल; लातूरच्या कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट, मुंडेही उपस्थित

नेपाळ : आंदोलकांनी आग लावलेल्या हॉटेलमधून पळण्याच्या प्रयत्नात भारतीय महिलेचा मृत्यू

Ulhasnagar : सेंच्युरी कंपनीच्या कँटीनमध्ये बनावट कूपन घोटाळा उघडकीस; प्रिंटिंग प्रेसवर पोलिसांची कारवाई

धुळ्यात माजी स्थायी सभापतीच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दोनच दिवसात उचललं टोकाचं पाऊल