सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ सुतार टेकडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत भाविकांना घेऊन जाणारी पिकअप गाडी कोसळल्याने ८ जण ठार झाले असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या अपघातात १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये महिला व लहान मुला-मुलींचा समावेश आहे. सायंकाळपर्यंत ८ जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले, तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहन विहिरींमधून बाहेर काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघात घडल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार उत्तम जानकर तसेच माजी आमदार राम सातपुते घटनास्थळाकडे रवाना झाले, तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मृतांमध्ये इंदुबाई दशरथ बावचे (६०), पूजा अमोल सातोरे (२३), पूजा बालाजी बावचे (२७),अश्विनी संदीप बावचे (२७), संस्कार संदीप बावचे (१४), संस्कृती संदीप बावचे (१४), आरव अमोल सातोरे (८) आणि समर्थ बालाजी बावचे (६ महिने) यांचा समावेश आहे, तर सागर सावकार चौगुले (२५), संदीप दशरथ बावचे (३६), बालाजी दशरथ बावचे (३२), जीया बालाजी बावचे (२ वर्षे, ५ महिने ), शशिकला पोपट जाधव (५०) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील जवळपास १५ भाविक पिकअप गाडी करून सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनासाठी म्हसवडला गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण पिकअप वाहनातून रांझणी गावाकडे परतत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला शेतात मोठा व्यास असलेल्या व पाण्याने भरलेल्या खोल विहिरीजवळ वाहन गेल्यानंतर पिकअप थेट विहिरीत कोसळली. विहिरीला कठडे नसल्यामुळे विहीर मालक आणि चालकाच्या चुकीमुळे हा भीषण अपघात घडला असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
अपघात इतका अचानक घडला की, वाहनातील प्रवाशांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महसूल विभाग, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील पाण्याची पातळी अधिक असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव पथकांनी विहिरीत उतरून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. काही वेळानंतर आठ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच परिसरातील असल्याने रांझणी गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे. अनेक कुटुंबांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावल्याने गावात दुःखाचे सावट पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आणि हंबरडा फोडला होता. अनेकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू केले असून जखमींवर उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू असून वाहनाचा वेग, रस्त्याची परिस्थिती आणि तांत्रिक बिघाड या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. गाडीचालक सागर चौगुले अपघातात जखमी झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
धोकादायक विहीर अपघाताला कारणीभूत - आमदार जानकर
अपघाताची माहिती मिळाली असून रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरींमुळे हा अपघात झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. आपण तातडीने घटनास्थळावर पोहोचल्यानंतर भयावह चित्र होते. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे माळशिरसाचे आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले.
सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर
माळशिरस तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. या अपघातात ७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक तातडीने रवाना झाले असून स्थानिक प्रशासन संपर्कात आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत सरकारकडून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
आपण बाहेरगावी आहोत. आपणास अपघाताची माहिती मिळाली आहे. अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. भाविकांचे हकनाक बळी गेले आहेत. विहिरीला कठडे होते की नव्हते? हे पाहून चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार.पालकमंत्री जयकुमार गोरे