विलास तेरकर/लातूर :
गेल्या अडीच दशकांपासून लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधार ठरलेल्या सोयाबीन पिकाला यंदा दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. पावसाने दिलेली दडी, पावसातील दीर्घ खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल ७० ते ८० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर व्यापारी, बाजारपेठा, वाहतूकदार, हमाल आणि सोयाबीन प्रक्रिया उद्योगांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे.
मराठवाड्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेले सोयाबीन पीक संकटात सापडल्याने आगामी काळात आर्थिक उलाढालीवरही मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. गेल्या २५ वर्षांत सोयाबीन पिकाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमानात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला. कमी कालावधीत येणारे आणि नगदी उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. साधारण ९० दिवसांत उत्पादन देणाऱ्या या पिकातून शेतकऱ्यांच्या हातात एकाच हंगामात मोठ्या प्रमाणात पैसा येत होता. या उत्पन्नातून मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह, शेतीचा खर्च आणि इतर आर्थिक गरजा भागविणे शक्य होत होते. सोयाबीनच्या या आर्थिक उलाढालीमुळे ग्रामीण भागातील बाजारपेठा, छोटे-मोठे उद्योग आणि व्यवसायांनाही चालना मिळाली.
लातूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सोयाबीन हे प्रमुख खरीप पीक बनले आहे. गतवर्षी जिल्ह्यात सुमारे ४ लाख ८७ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा २०२६ मध्ये हे क्षेत्र वाढून तब्बल ४ लाख ९१ हजार २२१ हेक्टरवर पोहोचले आहे. यावरून शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकावरील वाढता विश्वास स्पष्ट होतो. मात्र, क्षेत्र वाढूनही पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी अधीक्षक दिलीप जाधव यांनीही सोयाबीनच्या वाढलेल्या पेरणी क्षेत्राची माहिती दिली.
शेतकरी चिंतेत
प्रगतिशील शेतकरी विजयकुमार मलवाड यांनी यंदाच्या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, यंदा अनेक भागांतील सोयाबीन पिकाची अवस्था अत्यंत बिकट आहे. प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या खंडामुळे उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने हा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे.
सोयाबीन कारखान्यांसमोर कच्च्या मालाचे संकट
लातूर जिल्ह्यात सोयाबीनवर आधारित लहान-मोठे १० ते १५ प्रक्रिया उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांना दररोज सुमारे ३०० टन सोयाबीनची आवश्यकता भासते. मात्र, यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने कारखान्यांना आवश्यक प्रमाणात कच्चा माल उपलब्ध होणे कठीण झाले आहे. परिणामी प्रक्रिया उद्योगांच्या उत्पादनावर आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या उद्योगांमधून अनेकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. सोयाबीनची आवक कमी झाल्यास कामगार, हमाल, वाहतूकदार आणि संबंधित व्यावसायिकांच्या रोजगारावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वच घटक संकटात
सोयाबीन हे केवळ शेतातील पीक नसून मराठवाड्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आर्थिक चक्र आहे. शेतकऱ्यांच्या हातात सोयाबीन विक्रीतून पैसा आला की बाजारपेठेत खरेदी वाढते. कृषी सेवा केंद्रे, किराणा दुकाने, कापड व्यवसाय, वाहन बाजार, वाहतूक व्यवसाय आणि इतर लहान-मोठ्या उद्योगांमध्ये आर्थिक उलाढाल होते. यंदा शेतकऱ्यांच्या हातातच पैसा येण्याची शक्यता कमी आहे.