शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा हादरा? सात खासदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा 
महाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा हादरा? सात खासदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना ठाकरे गटात फूट पाडण्यात यश आल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मुंबईतील लोकसभेचे दोन खासदार वगळता इतर सात खासदार शिंदे यांच्या गळाला लागल्याचे समजते.

Swapnil S

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना ठाकरे गटात फूट पाडण्यात यश आल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मुंबईतील लोकसभेचे  दोन खासदार वगळता इतर सात खासदार शिंदे यांच्या गळाला लागल्याचे समजते. सातपैकी एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाचा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात ठाकरे गटाला मोठा राजकीय हादरा बसणार असल्याचे सांगण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी एकनाथ  शिंदे यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या देशभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीत दाखल झालेल्या शिंदे यांची ठाकरे गटाच्या खासदारांनी भेट घेतली. या भेटीत पक्षांतरावर चर्चा होऊन पुढील रणनीती निश्चित करण्यात आली. शिंदे गटात सहभागी  होणाऱ्या संबंधित खासदारापैकी एकाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रस्ताव असून इतरांचा योग्य सन्मान राखण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे बोलले जाते.

लोकसभेत ठाकरे गटाचे अरविंद सावंत (मुंबई दक्षिण ), अनिल देसाई (मुंबई दक्षिण-मध्य), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर पूर्व), राजाभाऊ वाजे (नाशिक), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी),  नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (धाराशीव) आणि संजय देशमुख (यवतमाळ -वाशिम ) असे नऊ खासदार आहेत. यापैकी  दोन खासदार वगळता सात खासदारांवर 'ऑपरेशन टायगर' चा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगण्यात येते.ठाकरे गटाच्या खासदारांचे मन वळवण्यात शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. डॉ . शिंदे हे गेले अनेक महिन्यांपासून  ठाकरे गटाच्या खासदारांच्या संपर्कात होते. त्यांनी या खासदारांना प्रत्यक्ष भेटून आणि चर्चा करून त्यांना राजी केल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे ठाकरे गटात आता कोणत्याही क्षणी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, ही फक्त अफवा आहे, असा दावा ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांनी केला आहे. आमचे कोणीही खासदार शिंदेंना भेटलेले नाहीत.  या बातमीत काहीही तथ्य नाही. आमच्या खासदारांना अनेक प्रकारे संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. परंतु आमच्या खासदारांनी त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. ते शिंदे गटाच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे, असे राऊत यांनी सांगितले.

कोणीही पक्ष सोडून जाणार नाही: राऊत

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्षातील  फुटीचा   स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. कोणीही पक्ष सोडून जाणार नाही. ज्यांना जायचे होते ते निघून गेलेत. आता आमचे सर्व खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ असून पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. या सर्वांशी उद्धव ठाकरे यांचा चांगला संवाद सुरू असल्याचे  ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना  सांगितले.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग