संग्रहित छायाचित्र एएनआय
महाराष्ट्र

भाविकांसाठी ST ची धाव! आषाढी वारीसाठी ५ हजार जादा गाड्या; ग्रुप बुकिंग केल्यास तुमच्या गावातून थेट पंढरपूरची बस

भाविकांनी ग्रुप बुकिंग केल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करण्यात येणार...

Swapnil S

मुंबई : आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने ५ हजार विशेष बस गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविकांनी ग्रुप बुकिंग केल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवासी येतात. अनेक प्रवासी स्वत:च्या खासगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रवासात ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास करता येणार असून, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

चार तात्पुरती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्राकाळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक… अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून, जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बस स्थानकाचे नाव जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस

-चंद्रभागा बसस्थानक मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार

- भीमा यात्रा देगाव छत्रपती संभाजी नगर, नागपूर व अमरावती प्रदेश

- विठ्ठल कारखाना नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

- पांडुरंग बसस्थानक सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

गेल्या वर्षी १८ लाखांहून अधिक भाविकांचा प्रवास!

गेल्या वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४२४५ विशेष बसेस सोडल्या होत्या. गेल्या वर्षी यात्रा काळामध्ये १८ लाख, ३० हजार, ९३४ भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती.

फुकट्या प्रवाशांची खैर नाही!

यात्रा काळात फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे, अशा फुकट्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्राकाळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत.

वाहतूक नियोजनासाठी एसटीची मदत

एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा वेळी रस्त्यावर वाहतूककोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षारक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत.

Maharashtra Assembly Elections 2024: जागावाटपापूर्वीच अजितदादांनी १७ जणांना दिले ‘एबी फॉर्म’

Maharashtra Assembly Elections 2024: नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिसूचना; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ तारखेपर्यंत मुदत

१ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची नवी धमकी

मुंबईत शिवसेना ठाकरे गट देणार 'हे' नवे चेहरे; मातोश्रीवर होणार अंतिम निर्णय