महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर, वाढीव वेतनश्रेणीचा जीआर जारी

जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारी अधिकारी-कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा

प्रतिनिधी

राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या १०५ संवर्गातील वेतन त्रुटी दूर करत वाढीव वेतनश्रेणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, मात्र याचे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाहीत. वेतनश्रेणीतील तफावत दूर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या के. पी. बक्षी समितीच्या या संदर्भातील शिफारसी स्वीकारण्यात आल्याचा जीआर वित्त विभागाने सोमवारी जारी केला आहे. त्यामुळे वीस विभागांतील १०४ संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना यापुढे वाढीव वेतनाचा लाभ मिळणार आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारी अधिकारी-कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर त्यांचा रोष आता कमी होतो का, हे पहावे लागेल.

केंद्र सरकारने २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला. त्यानंतर राज्यातही सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, पाचवा आणि सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या वेळीच अनेक संवर्गाच्या वेतनात वेतन त्रुटी होत्या. सातव्या वेतन आयोगातही या त्रुटी कायम राहणार असल्याने त्या दूर करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती. या पार्श्वभूमीवर वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी निवृत्त अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांची राज्य वेतन सुधारणा समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने २०१८ साली आपला पहिला अहवाल दिला. मात्र, तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अधिक अभ्यास करण्याची शिफारस करत हा अहवाल परत पाठवला.

त्यानंतर बक्षी समितीने ८ फेब्रुवारी २०२१ साली आपला अंतिम अहवाल सादर केला. जवळपास ३५० पदांबाबत अन्याय झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला होता. त्यातील १०५ पदांबाबतचा अन्याय बक्षी समितीने मान्य केला असून, या पदांच्या वेतन त्रुटी दूर करण्याच्या शिफारशी आपल्या अहवालात केल्या होत्या.

वाढीव वेतन पूर्वलक्षी प्रभावाने नाही

राज्य सरकारने २० विभागांतील १०५ पदांच्या वेतन त्रुटी दूर करण्याचा जीआर सोमवारी जारी केला आहे. सातवा वेतन आयोग २०१६ साली लागू करण्यात आला असला, तरी बक्षी समितीच्या शिफारसीनुसार या १०४ पदांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मात्र फेब्रुवारी २०२३ पासून लागू होणार आहे. २०१६ पासून आतापर्यंत काल्पनिक वेतनवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मागील काळातील कोणतीही थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.

LPG टँकर 'ग्रीन सान्वी' मुंबईकडे मार्गस्थ; होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे सातवे भारतीय जहाज

Navi Mumbai : 'डिजिटल अरेस्ट'चा सापळा! पनवेलमधील ज्येष्ठ नागरिकाला ८ दिवसांत १.५४ कोटींचा गंडा

Nashik : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर

Chandrapur : मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून प्रेयसीची हत्या अन् केला आत्महत्येचा बनाव; आरोपी प्रियकर अटकेत

Mumbai : 'पिंक टॉयलेट'मध्येच कॅफे! फॅशन स्ट्रीटजवळील प्रकार उघड; स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह, Video