नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार ह्या नुकत्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका स्नेहमेळाव्यात उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी स्वतः याची माहिती फेसबुकवर पोस्ट करत दिली आहे.
राज्यसभेतील आमचे सहकारी गोविंदभाई ढोलकियाजी यांच्यावतीने आयोजित स्नेहमेळाव्यात त्यांच्या कुटुंबीयांसह तसेच राज्यसभेतील काही मान्यवर सदस्यांच्या उपस्थितीत आपण सहभागी झाले, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी, लोकसभा खासदार कंगना रनौत यांच्या घरी स्नेहपूर्वक कौटुंबिक भेट झाल्याचे म्हटले आहे. याप्रसंगी परस्परांमध्ये स्नेहपूर्ण संवाद साधले गेले आणि आपुलकीचे क्षण अनुभवता आले, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यांनी कंगना रनौत यांच्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे.
ढोलकिया कोण आहेत?
गोविंदभाई ढोलकिया हे गुजरातमधील भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. ते प्रसिद्ध हिरे व्यापारी आहेत. त्यांनी अयोध्येतील राम मंदिराला ११ कोटी रुपयांची देणगी दिली होती. ते ‘आरएसएस’शी संबंधित आहेत. त्यांचा १९९२ मधील राम जन्मभूमी आंदोलनात सहभाग होता.