कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची मागणी करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत योग्यवेळी ही सुनावणी होईल, असे सांगितले आहे. एवढेच नाही तर न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलाला हिजाब वादाचा परीक्षांशी काहीही संबंध नाही, असेही बजावले आहे.
या प्रकरणाच्या युक्तिवादावर सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले की, ‘परीक्षांचा या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. त्याचा उल्लेख करून सनसनाटी निर्माण करू नका.’ याआधीही न्यायालयाने हिजाब वादावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. होळीच्या सुट्टीनंतर यावर विचार केला जाईल, असे कोर्टाने म्हटले होते. हे प्रकरण गुरुवारी मुख्य न्यायमूर्तींसमोर तातडीने सुनावणीसाठी ठेवण्यात आले. यावेळी हिजाब समर्थकांचे वकील देवदत्त कामत म्हणाले की, ‘२८ मार्चपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश दिला नाही तर त्यांचे एक वर्ष वाया जाईल.’
हायकोर्टाच्या निकालानंतरही वाद सुरूच
देशभर गाजलेल्या हिजाब प्रकरणावर काही दिवसांपूर्वी कर्नाटक हायकोर्टाच्या खंडपीठाने निकाल दिला असून, हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते. दरम्यान, हायकोर्टाने हिजाबसंबंधी निर्णय दिलेला असतानाही अद्याप वाद शमलेला नाही. विद्यार्थी हिजाबवर ठाम आहेत.