(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Swapnil S

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. अपघातस्थळी अजित पवार यांचे चार मोबाईल सापडतात, मग ब्लॅक बॉक्सची माहिती मिळण्यात तांत्रिक अडचणी कशा येतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची चौकशी एएआयबी (Aircraft Accident Investigation Bureau) आणि डीजीसीए (Directorate General of Civil Aviation) यांच्या मार्फत अत्यंत पारदर्शक आणि शास्त्रीय पद्धतीने व्हावी, अशी आग्रही मागणी सुळे यांनी केली. माझा दादा गेला, ते दुःख आयुष्यभर राहील, अशा अत्यंत भावूक शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

देशातील सव्वातीन लाख महिला बेपत्ता असल्याच्या माहितीवर सुळे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. संसदीय गृह समितीमार्फत याबाबत विशेष चर्चा आणि अधिकृत आकडेवारी मागवण्यात आली असून महिनाभरात ठोस माहिती मिळेल, असे त्यांनी सांगितले. भिगवण येथील घटनेबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आणि राज्यात हिंसाचाराचा नवा ट्रेंड सुरू होणे दुर्दैवी असल्याचे नमूद केले.

संसदेत चर्चेसाठी पुढाकार

अजित पवार यांच्या अपघातावर लोकसभेत चर्चा व्हावी यासाठी ‘मोशन मूव्ह’ केल्याबद्दल सुळे यांनी शिवसेना, कॉंग्रेस तसेच इंडिया आघाडीतील नेत्यांचे आभार मानले. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत येत्या आठ-दहा दिवसांत निर्णय होईल, असे संकेतही त्यांनी दिले. कौटुंबिक दुःख पचवून अजित पवार यांचे विकासाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी कामाला लागणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पाणी प्रश्नावर पत्र

पुणे महापालिकेत विविध विकासकामांच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुळे यांनी पुणे रिंग रोडचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या कामांचा दर दोन महिन्यांनी आढावा घेणार आहे, असे सांगतानाच पुण्यातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतरित करू नये, अशी विनंती प्रशासनाकडे केली असून त्याबाबत सकारात्मक शब्द मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

विलीनीकरण चर्चेवर ‘राम कृष्ण हरी’

राजकीय घडामोडींवर बोलताना आमदार रोहित पवार यांनी एनडीएमध्ये जाणे किंवा सत्तेतून बाहेर पडणे या दोन पर्यायांवर अजित पवारांशी चर्चा झाली होती, असा दावा केला. मात्र पक्षातील दोन नेत्यांच्या विरोधामुळे निर्णय रेंगाळला, असेही त्यांनी म्हटले. या संदर्भात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे पुढे येत असताना सुळे यांनी राम कृष्ण हरी म्हणत अधिक भाष्य टाळले.

दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; अकासा एअर आणि स्पाइसजेटचे नुकसान, प्रवासी सुखरूप

TCS प्रकरणात दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी नाशिकमध्ये; १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण