संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने? संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने?

राज्यातील विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर होताच महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Swapnil S

रायगड : राज्यातील विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर होताच महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कोकणातील विधान परिषद जागेवरून शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. या जागेसाठी आता मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे पुन्हा अप्रत्यक्षपणे आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील या जागेसाठी आधीपासूनच अनेक इच्छुक मैदानात असताना भरत गोगावले यांनी आपला मुलगा विकास गोगावले यांच्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सुमारे दहा मिनिटे चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदेंनी यावेळी 'वेट अँड वॉच'चा सल्ला दिला असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुनील तटकरे हेही आपला मुलगा अनिकेत तटकरे यांच्या नावासाठी आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय प्रतिष्ठेची न राहता दोन प्रभावी कोकणी राजकीय घराण्यांमधील ताकदीची चाचणी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांचे नावही चर्चेत आले आहे. त्यामुळे शिवसेनेतच एकापेक्षा अधिक दावेदार निर्माण झाल्याने अंतिम उमेदवारीवरून अंतर्गत समन्वयाची मोठी परीक्षा असणार आहे.

राजकीय गणिताच्या दृष्टीने पाहता कोकण विभागात शिंदे गटाचे संख्याबळ तुलनेने मजबूत मानले जात आहे. मात्र, कोकणातील राजकारणात सुनील तटकरे यांचा प्रभाव आणि राष्ट्रवादीची रणनीती लक्षात घेता ही लढत सहज होणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत महायुतीतील समन्वय, पक्षश्रेष्ठींचे निर्णय आणि स्थानिक राजकीय समीकरणे याकडे कोकणाचे लक्ष लागले आहे.

Instamart वरून आता एलपीजी सिलिंडरची होम डिलिव्हरी; स्विगीची HPCL सोबत भागीदारी, कनेक्शनशिवाय करता येणार ऑर्डर

Video : नोएडात ई-बाईक चार्जिंगवेळी भीषण आग; दोघांचा गुदमरून मृत्यू, ५० कुटुंबांची सुटका

Mumbai : एसी लोकलमधील तांत्रिक बिघाडानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रोटोकॉल लागू

माळशेज घाटात सोसाट्याचा वारा; दुचाकीही डगमगली, VIDEO पाहून नेटकरी थक्क

Mumbai : कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या; ओशिवरा पोलीस ठाण्याच्या शेजारीच थरार