नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर कथित लैंगिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत कंपनीच्या दिल्ली येथील मुख्यालयाने तातडीने कारवाई सुरू केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम नाशिकमध्ये दाखल झाली आहे.
अंतर्गत चौकशीसाठी टीम दाखल
माहितीनुसार, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता कंपनीकडून अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून चौकशीदरम्यान कामकाजात अडथळा येऊ नये आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता राखली जाईल. कामगार उपायुक्त कार्यालयाने कंपनीवर धाड टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत.
SIT तपासात धक्कादायक माहिती
विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीदा खान ही ऑपरेशन्स विभागात व्यवस्थापक आणि टीम लीडर म्हणून कार्यरत होती. दररोजच्या मीटिंगमध्ये कामाच्या निमित्ताने काही हिंदू महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप आहे.
कामाच्या प्लॅनिंगच्या बहाण्याने त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
विरोध करणाऱ्या महिलांचा छळ
धर्मांतरास नकार देणाऱ्या महिलांवर मानसिक तसेच लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व गोष्टी एका विशिष्ट व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून केल्या जात असल्याचेही समोर आले आहे. तसेच, या प्रकरणात आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत ७ जण अटकेत
या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात कंपनीतील एचआर (HR) अधिकारी अश्विनी चैनानी यांचाही समावेश आहे. त्यांच्या चौकशीतून नीदा खानची भूमिका समोर आल्याचे सांगितले जात आहे. नीदा खानचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या तीन पथकांना रवाना करण्यात आले आहे.
कामगार विभागाची चौकशी
दरम्यान, कामगार उपआयुक्त कार्यालयाच्या पथकाने कंपनीत तपासासाठी भेट दिली असता एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळले. प्रशासनाने दुकान व आस्थापना परवाना (Shop Act Licence) आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करून काही नोंदी जप्त केल्या आहेत.
तसेच, अंतर्गत चौकशीदरम्यान कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून अनेक गंभीर तक्रारी समोर येत असल्याची माहिती आहे.
महिला आयोगाचे पथक येणार
या प्रकरणाने राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले असून राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक १८ एप्रिल रोजी नाशिकमध्ये दाखल होणार आहे. हे पथक पीडित महिलांशी संवाद साधून प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहे.
या गंभीर प्रकरणामुळे नाशिकसह देशभरात खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.