महाराष्ट्र

'बार्टी'च्या ३० स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रांची निविदा प्रक्रिया वादात ; हायकोर्टात आठ याचिका दाखल

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नव्याने राबवत असलेली निविदा प्रक्रिया तूर्त 'जैसे थे' स्थितीत ठेवण्याचे निर्देश दिले

नवशक्ती Web Desk

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत बार्टी संचालित ३० स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रांवरील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीची प्रशिक्षण योजना बंद करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिकांची हायकोर्टने गंभीर दखल घेतली. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नव्याने राबवत असलेली निविदा प्रक्रिया तूर्त 'जैसे थे' स्थितीत ठेवण्याचे निर्देश दिले.

बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने राज्यभरातील ३० संस्थांमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सामाजिक न्याय विभागाच्या मान्यतेने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार 'बार्टी'कडून राज्यातील ३० संस्थांची निवड करण्यात आली; मात्र सरकारने या संस्थांमधील प्रशिक्षण योजना अचानक बंद करून अनुसूचित जातीतील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. २०२२ मध्ये अनुसूचित जातीच्या ६ हजार विद्यार्थ्यांचे पोलीस भरतीचे मंजूर असलेले प्रशिक्षण राबविले नाही. परिणामी, पोलीस भरतीमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. याकडे लक्ष वेधणाऱ्या आठ याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

या याचिकांवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्या वतीने ज्येष्ठ अॅड. उदय वारुंजीकर, अॅड. डॉ. सुरेश माने व इतर वकिलांनी राज्य सरकारची ही निविदा प्रक्रिया नियमबाह्य असल्याला दावा केला, तर राज्यसरकारतर्फे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी निविदा प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. याची दखल घेत खंडपीठाने तूर्तास निविदा प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घेऊ नका, असे निर्देश राज्य सरकारला देत याचिकांची पुढील सुनावणी ५ जूनला निश्चित केली.

Mumbai : 'मोदी, मोदी' विरुद्ध 'ठाकरे, ठाकरे'च्या घोषणाबाजीत रितू तावडे ७७व्या महापौर, शिंदेसेनेचे संजय घाडी उपमहापौर

केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम्' अनिवार्य, काय आहेत नवे नियम?

होणाऱ्या जावयाचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंनी दिली गुडन्यूज; म्हणाल्या, "सांगायला आनंद होतोय की...

२३ फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला होणार सादर

Mumbai : धावत्या लोकलमध्ये चढताना महिलेचा तोल गेला अन्...; रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वाचला जीव; कुर्ला स्टेशनवरील CCTV व्हायरल