मुंबई : राज ठाकरे यांचे एकत्र येण्यासाठीचे आवाहन त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा त्यास सकारात्मक प्रतिसाद यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार, अशी जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी स्पष्ट केले की, ‘महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर अडचण काय? महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावे हीच राज ठाकरे यांची भूमिका आहे. महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असेल तर काही लोकांना हे भाऊ आणि समविचारी लोक एकत्र आलेले नको आहेत. राज ठाकरेंनी विषय मांडला, तो विषय महाराष्ट्र हिताचा आहे. उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. तो प्रतिसादही महाराष्ट्र हितासाठी आहे. यामध्ये कुठल्याही अटीशर्ती नाहीत. जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत, ते ठाकरे आहेत. ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विषयावर सहमती होत असतील, तर त्यात फार वादविवाद करणे योग्य नाही. त्यात अट आणि शर्त आहे कुठे, कोणतीच नाही. एकही अट-शर्त कोणीही टाकलेली नाही. या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजप बसत नाही. ही अट नाही, लोकभावना आहे. याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडासा राजकीय अभ्यास करणे गरजेचे आहे आणि विशेषत: महाराष्ट्राच्या भावनेचा, अशी आमची भूमिका स्पष्ट आहे, असे संजय राऊत म्हणाले.
मला जेव्हा कळले राज ठाकरे बाजूला जात आहेत. त्यावेळी बारा वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा मी कोणाशीही बोलत नव्हतो. पण मला कळल्यानंतर मी स्वतःहून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मी सांगितले की, माझे ऐका आठ दिवस शांत राहा, त्याप्रमाणे ते राहिले. पण, दुर्दैवाने जे व्हायचे ते झाले. आता ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणाला होणार नाही. माझा पक्ष वेगळा आहे. शिवसेनेबद्दल आमचे प्रेम कमी झालेले नाही. सगळे कुटुंब एकत्र आले तर फार बरे होईल, असेही संजय राऊत म्हणाले.
...तर शिवसेनेची शक्ती वाढेल
ठाकरे बंधूंमध्ये युती झाली तर राजकारणावर काहीसा परिणाम होणार हे निश्चित आहे. दोन कार्यकर्ते आम्हाला मिळाले तर शक्ती वाढल्यासारखे वाटते, हे तर लीडर आहेत. एखादा पडलेला आमदारसुद्धा आम्ही आमच्यात घेतला तर शक्ती वाढली असे आपण म्हणतो आणि हे तर नेते आहेत, असे ते म्हणाले.
राज ठाकरेंशी मैत्रीचे संबंध संपले - शेलार
वैयक्तिक वगैरे आत्तापर्यंतचे जे शब्द होते ते पुरे करा. माझ्या दृष्टीने राज ठाकरे वैयक्तिक मित्र होते तो विषय आता संपला, राजकीय भाष्य इतकेच करेन त्या दोघांचा प्रश्न आहे. ते दोन पक्ष आहेत त्यांनी काय ते ठरवावे, असे भाजपचे नेते व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी राज व उद्धव एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.