मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आता मराठा आरक्षणाशी संबंधित ‘सगेसोयरे’चा अध्यादेश रद्द करण्याची मागणी केली आहे. या अध्यादेशामुळे कायद्यात हस्तक्षेप होत असल्याने तो तत्काळ रद्द करावा. मराठा समाजाला कुणबी दाखल्याचे करण्यात येणारे वाटपही तातडीने थांबवण्यात यावे, अशी मागणी वंचितने केली आहे. वंचितच्या या मागणीमुळे मराठा आरक्षण समर्थकांत अस्वस्थता पसरली आहे.
यापूर्वी, मनोज जरांगेंच्या नेतृत्वातील मराठा आंदोलनाला प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला होता. प्रकाश आंबेडकर यांनी आंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेटही घेतली होती. पण आता त्यांनी भूमिका बदलून मराठा आरक्षणाशी संबंधित ‘सगेसोयरे’ अध्यादेशाला विरोध केला आहे. वंचितने छत्रपती राजर्षि शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त याप्रकरणी ११ महत्त्वपूर्ण ठराव पारित केले आहेत. या ठरावांद्वारे पक्षाने हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी केली आहे. या ठरावाचे बॅनर वंचितने विविध शहरांतील चौकांत लावले असून, त्याची माहिती वंचितने एका ट्विटद्वारे दिली आहे.