PTI
महाराष्ट्र

महिला मतदारांचा टक्का ठरणार निर्णायक, राज्यात महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६० लाखांवर

निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची हा सर्वश्री अधिकार मतदारराजाचा. राज्यात ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ मतदार आहेत. यापैकी ४ कोटी ६० लाख ३४ हजार ३६२ महिला मतदार.

गिरीश चित्रे

मुंबई : निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची हा सर्वश्री अधिकार मतदारराजाचा. राज्यात ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ मतदार आहेत. यापैकी ४ कोटी ६० लाख ३४ हजार ३६२ महिला मतदार. त्यामुळे एकूण मतदारांपैकी महिला मतदारांची संख्या लक्षात घेता महायुतीने विविध योजनांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा कौल आपल्याला मिळावा, यासाठी महिलांनाच साद घातली आहे. मात्र निवडणुकीत महिला मतदारांचा महायुतीला किती फायदा होईल, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. 

लोकसभा, विधानसभा, नगरसेवक पदाची निवडणूक असो, मतदारांचा कौल त्या त्या पक्षाचे भवितव्य ठरवतो. लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला मतदारांनी झटका दिल्याने महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत मतदारावर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे महिला मतदारांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पिंक ई रिक्षा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा विविध योजनांची घोषणा केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत दीड कोटींहून अधिक बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले. लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली. या जनसन्मान यात्रेत महिलांचे प्रश्न जाणून घेत प्रश्नाचे निवारण करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनसन्मान यात्रेत महिलांचा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केला आहे. तर भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही 'देवा भाऊ' कार्यक्रमांतर्गत महिलांशी संवाद साधला. राज्यातील मतदारांचा आकडा बघता महिला मतदारांचा टक्का निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे महिला मतदारांचा कौल मिळावा यासाठी महायुतीने विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केल्याचे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

राज्यातील मतदार

  • पुरुष - ४,९३,३३,९९६

  • महिला - ४,६०,३४,३६२

  • तृतीय पंथ - ५,९४४ 

  • एकूण - ९,५३,७४,३०२

मुंबई शहर

  • पुरुष - १३,५५,९८२ 

  • महिला - ११,६३,३७४

  • तृतीय पंथ - २३०

मुंबई उपनगर

  • पुरुष - ४०,५८,६१०

  • महिला - ३५,२३,४३६

  • तृतीय पंथ - ८२० 

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय - उद्धव ठाकरे