महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची सीमाभागाला बगल ; कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात सीमाभागात एकही सभा नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असताना इकडे काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेतेही प्रचारासाठी जोर लावून उतरले

नवशक्ती Web Desk

सीमाभागासाठी आक्रमक झालेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात सभा घेणार आहेत, मात्र बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी या सीमावादातील भागांत मुख्यमंत्री शिंदे यांची एकही सभा भाजपने आयोजित केलेली नाही. शिवाय महाराष्ट्र एकीकरण समितीने एकाही मराठी नेत्याची सीमाभागात सभा होऊ दिली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्याचा धसका महाराष्ट्रातील नेत्यांनी घेतला आहे.

१० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. सत्ताधारी भाजपच्या बाजूने सर्वेक्षणाचे कौल नसल्याने भाजपने पंतप्रधानांसह देशभरातील नेत्यांना प्रचारात उतरवले आहे. तसेच विविध राज्यांतील आपल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनाही प्रचारात उतरवले आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात उतरले आहेत. मराठी मते मिळवण्यासाठी भाजपने शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे शिंदेंचा भाजपला कितीपत फायदा होणार, हे पाहावे लागेल. असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषिक असलेल्या सीमावर्ती भागाकडे मात्र पाठ फिरवली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवार आणि सोमवार अशा दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते बंगळुरू, मंगळुरू, उडुप्पी, कापू येथे रोड शोमध्ये भाग घेणार आहेत. बंगळुरू येथे शिंदे यांनी रविवारी मराठी नेत्यांची बैठक घेतली. अन्य ठिकाणीदेखील ते मराठी भाषिक मतदारांशी संवाद साधणार आहेत. मात्र, सीमाभागात ते एकही सभा घेणार नाहीत. कर्नाटकात मराठी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तिथे शिंदेंचा उपयोग भाजपकडून केला जात आहे.

एकनाथ शिंदे हे सीमावर्ती भागात प्रचार करणार होते. मात्र, संजय राऊत यांनी मराठी एकीकरण समितीच्या विरोधात येणाऱ्यांना हिसका दाखवण्याचे आवाहन सीमावर्ती भागातल्या मतदारांना केलं आहे. शिवाय एकीकरण समिती मराठी नेत्यांच्या विरोधात आक्रमक आहे. यामुळेच शिंदेंनी आपला मोर्चा बंगळुरूकडे वळवला असल्याचे बोलले जात आहे. बंगळुरू आणि परिसरात मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत. काँग्रेसने भाजप समोर मोठे आव्हान निर्माण केल्याने एक एक मत भाजपसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिंदे प्रचारात उतरले आहेत. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सत्ताबदल झाला आहे, त्याच पद्धतीने कर्नाटकातही भाजपने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे शिंदेंचे आवाहन मराठी भाषिक किती पाळतात, यावर मराठी मतदारांचे मत अवलंबून आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असताना इकडे काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेतेही प्रचारासाठी जोर लावून उतरले आहेत. मात्र, त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ४ मे रोजी बेळगावात प्रचारासाठी गेलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि सतेज पाटील यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने काळे झेंडे दाखवून विरोध केला होता, तर ५ मे रोजी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळूण लावण्यात आली.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

शहाड उड्डाणपूल १८ दिवसांसाठी बंद; १५ ऑक्टोबरपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर अनिवार्य

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म १८ राहणार बंद; पुनर्विकासासाठी ८० दिवस फलाट बंद; दोन एक्स्प्रेस दादरपर्यंतच चालणार