तीन वर्षीय विधी CET प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर; ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार 
महाराष्ट्र

तीन वर्षीय विधी CET प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर; ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यातील २ विद्यार्थी राज्यातील असून २ विद्यार्थी महाराष्ट्र बाहेरील राज्यातील आहेत.

सदरचा निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा १ व २ एप्रिल रोजी दोन दिवसात चार सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण ८३ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत चार सत्रात मिळून ६९ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ४५ हजार १११ विद्यार्थी, २४ हजार ३५८ विद्यार्थिनी होत्या. तर ४ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नोंदणीच्या एकूण ८३.२१ टक्के विद्यार्थ्यांची या परीक्षेला उपस्थिती होती. ही सीईटी परीक्षा राज्यातील ६७,९४९ तर राज्याबाहेरील १५२४ विद्यार्थ्यांनी दिली.

१०० पर्सेंटाईल गुण मिळविणारे ४ विद्यार्थी

तीन वर्षीय विधी सीईटीमध्ये एकूण ४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. राज्यातील मुंबई उपनगरातील अमेय विश्वेश राजगुरू व ठाणे येथील जीत संजय बर्दापूरकर या दोन विद्यार्थ्यांनी तर पूर्व दिल्लीतील अक्षत भारद्वाज व राजस्थानमधील सीकर येथील मोहम्मद रिजवान या राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.

पर्सेंटाईल व टक्केवारी यातील फरक

सीईटीचा निकाल हा पर्सेंटाईलमध्ये जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांनी सीईटीचा निकाल पाहताना टक्केवारी न पाहता पर्सेंटाईल पहावे. १०० पैकी मिळालेला एक निश्चित भाग किंवा गुण दर्शवते. तर पर्सेंटाईल हे इतर उमेदवारांच्या तुलनेत तुमचे रँकिंग म्हणजेच तुम्ही स्पर्धेत कुठे आहात, हे दर्शवते. टक्केवारी एकूण गुणांपैकी तुम्हाला मिळालेला हिस्सा दाखवते, तर पर्सेन्टाईल तुम्ही इतरांपेक्षा किती पुढे आहात हे दाखवते. हे पर्सेन्टाईल हे अत्यंत अचूक आणि योग्य पद्धतीनेच कॅल्क्युलेट केलेले असतात. त्यामुळे त्यामध्ये कोणतीही तफावत किंवा चूक असण्याची शक्यता नसते.

Mumbai : प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये मिळणार घरे; एक हजार ‘पीएपी’ घरे ऑगस्टपर्यंत तयार, मुलुंडमधील प्रकल्प मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करणार

५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेकडे रवाना; साडेसहा फूट उंच भव्य मूर्ती न्हावाशेवा बंदरातून परदेशी वारीला

समुपदेशनाद्वारे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; आरोग्यमंत्री, राज्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी

इंडिया आघाडीची आज बैठक; काँग्रेससह २३ पक्ष एकत्र येणार

गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर कारवाई; दोन कोटी किमतीचा गुटखा जप्त