मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने शनिवारी राजकीय वर्तुळात वादाचा धुरळा उडाला. सपकाळ यांच्या या विधानाचा समाचार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सपकाळ यांच्या विधानावर टीकास्त्र सोडले. या वादानंतर सारवासारव करताना सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला लक्ष्य केले.
मालेगावच्या महापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानची प्रतिमा लावली आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून ही प्रतिमा हटवण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार दिलेला आहे. याच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले. त्यामुळे टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.
सपकाळ यांच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतानसोबत केलेल्या तुलनेबाबत माफी मागितली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली, तर टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणारा आहे. हा छत्रपती शिवरायाचा अपमान आणि इतिहासद्रोहच आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले ते न्याय, स्त्रीसन्मान आणि लोककल्याण यांच्या भक्कम तत्त्वांवर ! इतिहासात टिपू सुलतानाच्या कारकिर्दीबाबत अनेक ठिकाणी धार्मिक अत्याचार, जबरदस्ती धर्मांतर आणि क्रूर दडपशाहीचे उल्लेख आढळतात. याला केवळ आपल्या लांगुलचालनाच्या स्वार्थी राजकारणासाठी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष म्हणणे, याहून नीचपणाचे अधिक काय असेल ? असा सवालही बावनकुळे यांनी केला आहे.
फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकवू नये - सपकाळ
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या टीकेला हर्षवर्धन सपकाळ यांनी उत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. शिवराय आमचा स्वाभिमान आहेत. टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजांच्या विरोधात लढत होते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते, त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी यांच्यासह कुणी-कुणी, काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही, अशी भूमिका सपकाळ यांनी 'एक्स' या समाज माध्यमातून मांडली आहे. संविधानाच्या मूळ प्रतीवर शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.