छत्रपती संभाजीनगर : राजकारण हे समाजसेवा, राष्ट्रउभारणी आणि विकास यांच्याशी जोडलेले असते, मात्र सध्याच्या काळात राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण झाले आहे, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सत्कार समारंभात गडकरी बोलत होते. राजकारणाला मतभिन्नतेची नाही तर विचारांच्या अभावाची समस्या आहे. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण असा आहे. मात्र राजकारणाची व्याख्या आता बदलली असून ती सत्ताकारण अशी झाली आहे, असे गडकरी म्हणाले.
यापूर्वी रा. स्व. संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना आम्ही अनेक अडथळ्यांना सामोरे गेलो, आमच्याबद्दल आदराची भावना नव्हती, मात्र हरिभाऊ बागडे यांनी जनतेच्या कल्याणासाठी समर्पित भावनेने काम केले. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण २० वर्षे विदर्भ पिंजून काढला आणि काम केले. आमच्या मेळाव्यांवर जनता दगडफेक करीत होती. आणीबाणीनंतर घोषणा करण्यासाठी आपण ज्या रिक्षाचा वापर केला ती जाळण्यात आली, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.
...तोच खरा कार्यकर्ता!
आता हजारो लोक आपले भाषण ऐकण्यासाठी येतात, ही आपली लोकप्रियता नाही, तर हरिभाऊ बागडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचे त्यासाठी आभार मानले पाहिजेत. पक्षाकडून काहीही मिळाले नाही तरी ज्याचे वर्तन चांगले आहे, तोच खरा कार्यकर्ता. ज्यांना काहीतरी मिळते त्यांचे वर्तन स्वाभाविकपणे चांगले असते, असेही ते म्हणाले.