Sourced
महाराष्ट्र

पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ

स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Swapnil S

पुणे : स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहतूक पोलिसांच्या नोटीसनंतर आता पुणे महानगरपालिकेनेही पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांवर घरासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे ही नोटीस बजावली आहे.

दरम्यान, पूजा खेडकरप्रकरणी एक सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. जर या समितीच्या तपासात खेडकर दोषी आढळून आल्या तर त्यांची गच्छंती अटळ असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घरासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली असून त्यासाठी खेडकर कुटुंबीयांना पालिकेकडून ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेल्या बाणेर येथील नॅशनल हाऊसिंग सोसायटी या निवासस्थानाबाहेरील पदपथावरील बांधकाम काढून घेण्याचे महापालिकेने आदेश दिले आहेत. ७ दिवसांच्या आत केलेले बांधकाम स्वखर्चाने न काढल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. खेडकर यांच्या नॅशनल हाऊसिंग सोसायटी या बंगल्याबाहेर पदपथावर झाडे लावलेली आहेत. ही झाडे काढण्यासाठी नोटीस बजावली आहे. पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानावर बेकायदेशीर अतिक्रमणाची नोटीस लावली.

शल्य चिकित्सकांची चौकशी व्हावी

पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून २०२१ मध्ये मिळवले आहे. या प्रमाणपत्रामध्ये त्यांना दृष्टीदोष असल्याचे आणि मानसिक विकलांगता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अहमदनगरच्या या जिल्हा रुग्णालयांतील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांची चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पूजा खेडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा - अरुण भाटिया

पूजा खेडकर प्रकरणात सध्या चौकशीचं केवळ नाटक सुरू आहे. पूजा खेडकर यांच्यावर आधी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा, असे माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया यांनी म्हटले आहे.

सध्या सगळी शासकीय यंत्रणा भ्रष्ट झालेली आहे. सेवेतील सनदी अधिकारी भ्रष्ट आहेत. ते राजकारण्यांच्या पदराखाली दडलेले आहेत. पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तत्काळ कारवाई होत नाही, यामागे राजकीय शक्ती आहे, असा थेट आरोप अरुण भाटिया यांनी केला आहे.

पूजा खेडकरचे प्रकरण बाहेर आले याचा आनंद आहे. जनतेला सनदी सेवा किती भ्रष्ट आहे हे कळाले. २० टक्के सनदी अधिकारीच प्रामाणिक आहेत. सनदी सेवेमध्ये मुले केवळ परीक्षा पास होऊन येतात. त्यांची नैतिक गुणवत्ता तपासली जात नाही. त्यासाठी यूपीएससीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करावा, असे मत देखील अरुण भाटिया यांनी व्यक्त केले.

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या तरुण मुलांना हेरून त्यांना सनदी सेवेत आणले पाहिजे. नरेंद्र मोदी यांना आवाहन आहे की, त्यांनी वेगवेगळ्या संस्थात्मक बाबी बळकट कराव्यात, त्याशिवाय हे थांबणार नाही, असे देखील अरुण भाटिया म्हणाले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी