प्रतिकात्मक फोटो
महाराष्ट्र

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड; पती, पत्नी व लहान मुलाची हत्या

कर्जत तालुक्यातील चिकणपाडा या गावाच्या बाहेर असलेल्या पोशीर पाडा येथे पती, पत्नी आणि एका लहान मुलाची हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे

Swapnil S

कर्जत : कर्जत तालुक्यातील चिकणपाडा या गावाच्या बाहेर असलेल्या पोशीर पाडा येथे पती, पत्नी आणि एका लहान मुलाची हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी संशयित म्हणून मयत तरुणाच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. हत्या झालेली विवाहित महिला ही सात महिन्यांची गरोदर असून ती आरोग्य विभागात आशासेविका म्हणून कार्यरत होती. घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली असताना मध्यरात्री तिघांचा खून झाल्याने कर्जत तालुका हादरला आहे.

नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर चिकणपाडा हे मुस्लिमबहुल गाव असून, या गावाला लागून पोशीर पाडा ही हिंदूंची लहानशी वस्ती आहे. त्या ठिकाणी १५ वर्षांपूर्वी कळंबजवळील बोरगाव येथील जैतू पाटील यांनी जमीन खरेदी केली होती आणि त्या ठिकाणी घर बांधून ते कुटुंबासह राहत होते. जैतू पाटील यांच्या मदन आणि हनुमंत या दोन्ही मुलांचे विवाहदेखील चिकणपाडामधील पोशीर पाडा येथील घरी झाली आहेत. १३ वर्षांपूर्वी जैतू पाटील यांच्या मोठ्या मुलाचे मदन पाटील याचे लग्न झाल्यानंतर जैतू पाटील हे आपल्या पत्नीसह बोरगाव येथे राहायला गेले. त्यामुळे त्या घरात मदन तसेच त्याची पत्नी, मुलगा आणि भाऊ हनुमंत जैतू पाटील असे कुटुंब राहत होते. हनुमंत हा गवंडीकाम करायचा, तर मदन पाटील याची पत्नी अनिशा या तेथे आरोग्य विभागात आशासेविका म्हणून काम करीत होत्या.

घराच्या हिश्श्यावरून वाद

जैतू पाटील यांनी बांधलेले घर हे मदन जैतू पाटील याच्या नावावर होते. त्यामुळे वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून देण्यात यावा यासाठी हनुमंत हा भाऊ मदनसोबत वाद घालत असे.

यावर्षी मदन पाटील याच्या घरात पहिल्यांदा गणपती बाप्पाचे आगमन झाले होते, मात्र हनुमंत जैतू पाटील याने आपल्या पत्नीला माहेरी भडवळ येथे पाठवून दिले होते. सात सप्टेंबरच्या रात्री त्या दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याचे बोलले जाते. रविवारी सकाळी दहा वाजता नेरळ-कळंब रस्त्यावरील नाल्यात विवेक मदन पाटील या दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी त्यानंतर त्या मुलाच्या आईबाबाची चौकशी करण्यास सुरुवात केली असता त्याच नाल्यात अनिशा मदन पाटील हिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ग्रामस्थांनी या कुटुंबाच्या घराकडे धाव घेतली. घरी गेल्यावर सर्वांना धक्का बसला. घरात मदन जैतू पाटील याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

नेरळ पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी सर्व तिन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असून, याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या घरातील चौथा सदस्य असलेल्या हनुमंत जैतू पाटील यास संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

आजचे राशिभविष्य, २५ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी