मुंबई : प्रक्षोभक भाषण करून मुस्लिम समाजाला धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ श्रीरामपूर आणि तोफखाना परिसरात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभांमध्ये केलेल्या भाषणात नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजाला धमकी देणारे वक्तव्य केले. रामगिरी महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, मशिदीमध्ये घुसून एकेकाला मारू हे लक्षात ठेवा, अशी धमकी राणे देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. श्रीरामपूर आणि तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये राणे यांच्याविरुद्ध दोन एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. प्रेषित मोहम्मद आणि इस्लाम यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा रामगिरी महाराजांवर आरोप आहे.
सदर व्हायरल व्हिडीओ एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी एक्सवर टाकला असून नीतेश राणे यांना अटक करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. राणे मुस्लिमांविरोधात तिरस्कार पसरवत आहेत, त्यांचे भाषण प्रक्षोभक आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात जातीय हिंसाचार घडविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे पठाण यांनी म्हटले आहे.