आशिया कपमधील भारत-पाकिस्तान टी-२० सामना रविवारी (दि. १४) होणार आहे. या सामन्याचा विरोध करत शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "ज्या पाकिस्तानसोबत आपण युद्ध केलं, त्याच पाकिस्तानसोबत आता क्रिकेट खेळला जातोय. देशभक्तीची थट्टा नव्हे तर देशभक्तीचा व्यापार सुरू आहे," असे ठाकरे म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतरही सामना?
पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू आणि त्यानंतर हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, आपले जवान शहीद झाले, नागरिकांना हिंदू म्हणून गोळ्या घातल्या. मग देश, हिंदुत्व यापेक्षा भाजपासाठी व्यापार मोठा आहे का? भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकून दहशतवादाविरोधात आपली भूमिका ठाम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवायला हवे.
रक्त आणि क्रिकेट एकत्र नाही
पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध हाती घेण्यात आले, भारतीय सैन्याने कठोर उत्तर दिले. पण, सैन्याला थांबवण्यात आले. हे युद्ध थांबवणारे कोण? रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे होऊ शकतात? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली.
बाळासाहेबांचा पाकिस्तानला ठाम विरोध
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, तो बाळासाहेबांना भेटायला आला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी त्याच्या तोंडावर सांगितले होते की, पाकिस्तान आमच्या देशाशी नीट वागत नाही तोपर्यंत भारतात क्रिकेट होणार नाही. आज मात्र भाजपाचे नेते नवाज शरीफांच्या वाढदिवशी केक खायला जातात. त्यामुळे आम्हाला देशभक्ती शिकवू नये.
नीरज चोप्रा व 'अंधभक्त' वाद
यावेळी ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, नीरजने पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमला भारतात आमंत्रित केले म्हणून अंधभक्तांनी त्याला देशद्रोही ठरवले होते. मात्र, आता हेच लोक भारत-पाकिस्तान सामना खेळण्याला कसे समर्थन देतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हर घर से सिंदूर अभियान
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने राज्यभर हर घर से सिंदूर अभियान राबवण्याची घोषणा केली. महिला आघाडी कार्यकर्त्यांकडून घराघरातून सिंदूर गोळा करून तो पंतप्रधान कार्यालयाला पाठवला जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. "पहलगाम हल्ल्यात महिलांचे सौभाग्य हिरावले गेले. अशा वेळी भाजपा देशभक्तीच्या नावाखाली दांडियाचे आयोजन करते," असा आरोपही त्यांनी केला.