मुंबईः बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि महाराष्ट्र जलसंपदा विभाग यांनी भीमा नदीवरील मानवनिर्मित उजनी जलाशयाच्या 'पर्यावरणीय पुनर्संचयना' साठी सामंजस्य करार केला आहे.
उजनी जलाशय, ज्याला 'भिगवण' म्हणूनही ओळखले जाते, मध्य आशियाई स्थलांतर मार्गावरील एक महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र ('इम्पॉर्टंट बर्ड एरिया') म्हणून मान्यता प्राप्त आहे. हे ठिकाण स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमुख अधिवास असून शेती, जलविद्युत निर्मिती, पिण्याचे पाणी पुरवठा आणि स्थानिक मत्स्योद्योग यांना देखील सहाय्य करते, अशी माहिती बीएनएचएसचे वैज्ञानिक व मत्स्यतज्ज्ञ उमेश कटवटे यांनी दिली.
सिप्ला फाउंडेशनच्या सहाय्याने झालेला हा करार मंगळवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जलसंपदा विभाग हा बीएनएचएसला आवश्यक परवानग्या देईल आणि उजनी येथे पर्यावरणीय पुनर्संचयन व हवामान-लवचिक मत्स्यविकास कार्यक्रम राबविण्यास मदत करेल. पाणकुंभ, इपोमिया, टिलापिया, आफ्रिकन कॅटफिश आणि सकरमाऊथ कॅटफिश यांसारख्या आक्रमक परकीय प्रजातींमुळे निर्माण झालेल्या धोक्यांवर मात करणे या प्रकल्पाचा केंद्रबिंदू असेल, असे कटवटे यांनी सांगितले.
या उपक्रमाचा उद्देश स्थानिक अधिवासांचे पुनर्संचयन, शाश्वत मासेमारी पद्धतींचा प्रसार, पक्षी मार्गदर्शक व मत्स्यशिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रदेशातील इको-टुरिझमला चालना देणे असा आहे. त्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण आणि उपजीविकेची हमी एकत्र साधली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
ही भागीदारी ही दुर्मिळ अशी घटना आहे की, जलसंपदा विभागाने थेट जैवविविधता संवर्धन उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. उजनी प्रकल्प हा बीएनएचएसच्या नेतृत्वाखालील जलाशय पुनर्संचयन व मत्स्योद्योग विकास कार्यक्रमाचा पहिला प्रयोग आहे, असेही कटवटे यांनी सांगितले.