महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आजही तयारी; रामदास आठवले यांची नि:संदिग्ध ग्वाही

Swapnil S

मुंबई : रिपब्लिकन ऐक्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपली तयारी असल्याची नि:संदिग्ध ग्वाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिली. दै. ‘नवशक्ति’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी, 'नवशक्ति' - 'फ्री प्रेस' वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कर्नानी व संचालक अभिषेक कर्नानी यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्वागत केले व त्यांच्याशी देशापुढील विकासाच्या मुद्यांवर मनमोकळी चर्चा केली. त्यानंतर आठवले यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आपले विचार मांडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात देशातील पायाभूत सेवासुविधांचा झपाट्याने विकास होत असला तरी रेल्वे, विमान कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याची कबुली आठवले यांनी दिली. देशातील सध्याचे वातावरण पाहता, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ‘चारसो पार’चा पल्ला रालोआ गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रिपब्लिकन ऐक्याचे प्रयत्न याआधीही झाले आहेत. त्याचा इतिहास सर्वज्ञात आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी आजही सर्व गटातटांनी आपले पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. वंचितशी बोलणी फिस्कटल्यानंतर ‘मविआ’ आघाडीकडून आपल्याला ‘ऑफर’ होती, परंतु आपण त्यांच्याकडे गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे सांगून ते म्हणाले की, काही मूठभर मराठे श्रीमंत असले तरी बहुसंख्य मराठा समाज गरीब आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. तामिळनाडूच्या धर्तीवर अधिकचे आरक्षण दिल्यास हा प्रश्न सुटू शकतो. राज्याने प्रस्ताव दिल्यास त्यावर केंद्र सरकार विचार करू शकेल. जातनिहाय जनगणनेला आपला पाठिंबा असल्याचे सांगतानाच, प्रत्येक जातीच्या टक्क्यानुसार आरक्षण देण्यास आमची हरकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

दोन्ही ठाकरेंविषयीची भूमिका

रालोआमध्ये आम्ही असताना सोबत मनसेला घेण्याची गरज नव्हती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा भलेही मोठ्या होत असल्या तरी त्या मतांमध्ये परावर्तित होत नसल्याचे परखड भाष्य आठवले यांनी केले. उद्धव ठाकरे हे आपले मित्र असले तरी ते आता बेफाम झाले असून कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत ते नसल्याचे आठवले यांनी निदर्शनास आणले.

देशाच्या कानाकोपऱ्यात रिपाइं पक्ष वाढतोय

मोठे पक्ष छोट्या पक्षांना संपवितात, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात रालोआमध्ये आपला पक्ष छोटा असूनही तो देशाच्या कानाकोपऱ्यात वाढत आहे. गावागावात आपले कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांनी केला. त्याचवेळी महाराष्ट्रात शिर्डी व सोलापूरची जागा आम्ही मागितली होती. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही आमचा दोन जागांवरील दावा सोडला. आपण जसा विकासासाठी त्याग केला तसाच त्याग महायुतीतील इतर घटक पक्षांनी करून जागावाटपाचा तिढा सोडवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

KKR vs SRH: पावसामुळे सामना रद्द झाल्यास 'हा' संघ थेट फायनलमध्ये; आज ठरणार अंतिम फेरीचा पहिला मानकरी

Maharashtra HSC 12th Result 2024 Live Updates: बारावीचा निकाल जाहीर, ९३.३७ विद्यार्थी उत्तीर्ण!

नवी मुंबईत मॉरिशसच्या नागरिकाचा खून, छडा लागला; दोन अल्पवयीन मुलींसह एक तरुण पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीला मिळाला नवीन होस्ट, महेश मांजरेकरांच्या जागी दिसणार 'हा' अभिनेता

भाडेकरार संपुष्टात आला तर गाशा गुंडाळावाच लागेल, HC चा दणका; घर रिकामे करण्याच्या नोटिसीला स्थगिती देण्यास नकार