रामभाऊ जगताप / कराड
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे गेल्या चार दिवसांपासून बहिणींच्या बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून या योजनेच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी आणि सरकारचे काम घराघरांपर्यंत जाण्यासाठी जिल्हावार मेळावे घेतले जात आहेत. तेथे महिलांना ने-आण करण्यासाठी ग्रामीण भागाचे दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेसचा वापर करण्यात येत आहे. यासाठी अनेक एसटी बसेस भाडे करारावर देण्यात येत आहेत. त्यानुसार सातारा विभागाच्या १५० एसटी बस या रत्नागिरीच्या लाडकी बहीण कार्यक्रमासाठी पाठवण्यात आल्या असल्याने व त्या बसेस उद्या येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून,बस स्थानकावर प्रवाशांची गर्दीच गर्दी ओसंडून वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्य सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर लाडकी बहीण ही योजना राज्यात सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनातील अर्थसंकल्पात केली होती. या योजनेमुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपला प्रचंड मताधिक्य मिळाले. या योजनेमुळे आता राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी वातावरण निर्मितीसाठी या योजनेचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांकडून चढाओढ सुरू आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या बहिणींची ओवाळणी कोणाला मिळते, यावर पुढील सरकारची गणिते ठरणार आहेत. सध्या राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांकडून जिल्हावार लाडक्या बहिणीसाठी मेळावे घेण्यात येत आहेत. त्यासाठी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होत होता, त्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसमधून महिलांना कार्यक्रमस्थळी नेण्या-आणण्याची सोय करण्यात येत आहे. दरम्यान, महिलांच्या प्रवासासाठी एसटीच्या सातारा विभागाच्या तब्बल १५० एसटी बसेस या आरक्षित करून त्या रत्नागिरीला पाठवण्यात आल्या आहेत. सरकारकडूनच सातारा विभागाला फतवा आल्याने तेथील अधिकाऱ्यांना बस देण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
दरम्यान, एसटी बस रत्नागिरीला गेल्याने एसटीच्या प्रवासी वाहतुकीची घडी विस्कटली आहे. एसटीच्या सातारा, कराडसह जिल्ह्यातील १० आगारात प्रवाशांना एसटीविना बराच काळ ताटकळावे लागले. त्यामुळे एसटी बस स्थानके प्रवाशांनी ओसंडून वाहत होती.
अन्य विभागाच्या बसेस दाखल
सातारा विभागाच्या १५० एसटी बसेस या रत्नागिरीतील लाडकी बहिणीच्या कार्यक्रमासाठी पाठवाव्या लागणार होत्या. त्याचा विचार करून सातारा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर व अन्य विभागाच्या एसटी बसेस मागवल्या. मात्र, त्यांच्या मागणीच्या प्रमाणात एसटी बस उपलब्ध झाल्या नाहीत. परिणामी अनेक मार्गावरील एसटीच्या फेऱ्या बंद ठेवाव्या लागल्या. त्याचबरोबर प्रवाशांची संख्या आणि त्यातुलनेत उपलब्ध बसेस याचा मेळ घालता घालता एसटीच्या अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र पहायला मिळाले.
प्रवाशांची नाराजी
आम्हाला कराडवरून पुण्याला जाण्यासाठी बराच काळ थांबावे लागले. त्यानंतर एसटीच्या चौकशी कक्षात बस कधी लागेल? असे विचारल्यावर त्यांनी थोड्या वेळात लागेल, असे सांगितले. मात्र,तब्बल दोन तासांहून अधिक काळ झाला तरीही बस मिळाली नाही. अखेर खासगी वाहनाचा वापर करून प्रवास करावा लागला. मात्र याबाबत एसटीने प्रवाशांसाठी बसची काय व्यवस्था केली आहे? हे सांगणे गरजेचे होते, अशा प्रतिक्रिया कराड बस स्थानकातील अनेक प्रवाशांनी 'नवशक्ति'शी बोलताना व्यक्त केल्या.
खासगी प्रवासी वाहनांची चांदी
एसटी बसेसच्या काही फेऱ्या बसअभावी रद्द कराव्या लागल्यामुळे प्रवाशांची बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. बस वेळेत येत नसल्याने अनेक प्रवाशांनी खासगी वाहनाने प्रवास करण्यास पसंती दिल्याचे दिसले. खासगी प्रवासी वाहतूक सुरू नसती, तर अनेक प्रवाशांना मोठा फटका बसला असता. या वाहतुकीमुळे प्रवाशांची चांगली सोय झाली. मात्र खासगी प्रवासी वाहतुकीच्या वाहनचालकांची चांगलीच चांदी झाली.