वाल्मिक कराड PC : (X) @DharmendraAnam1
महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्याप्रकरण: मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच; विशेष मकोका न्यायालयाचे निरीक्षण

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे निरीक्षण विशेष मकोका न्यायालयाने नोंदवले आहे. वाल्मिक कराडने आपण निर्दोष असल्याचा दावा करत बीड जिल्हा न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज सादर केला होता. मात्र, या अर्जावर निर्णय देताना न्यायालयाने आरोपीविरुद्ध गंभीर निरीक्षणे नोंदवत बुधवारी त्याचा अर्ज फेटाळून लावला.

Swapnil S

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे निरीक्षण विशेष मकोका न्यायालयाने नोंदवले आहे. वाल्मिक कराडने आपण निर्दोष असल्याचा दावा करत बीड जिल्हा न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज सादर केला होता. मात्र, या अर्जावर निर्णय देताना न्यायालयाने आरोपीविरुद्ध गंभीर निरीक्षणे नोंदवत बुधवारी त्याचा अर्ज फेटाळून लावला.

विशेष मकोका न्यायालयाने कराडचा अर्ज फेटाळून लावत सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच होता, असे म्हटले आहे. वाल्मिक कराडवर तब्बल २० हून अधिक गुन्ह्यांची नोंदही यावेळी निरीक्षणांतर्गत मांडण्यात आली आहेत. तसेच गेल्या १० वर्षांमध्ये ७ गंभीर स्वरूपाचे गुन्हेही त्याच्यावर दाखल असल्याचे निरीक्षणात म्हटले आहे.

न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सदस्य आहे. याशिवाय, बीड जिल्हा न्यायालयात त्याच्याविरुद्ध ११ फौजदारी खटले अद्याप प्रलंबित आहेत. कराड आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एकूण २० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असून, त्यामध्ये खंडणी, धमक्या, जीवाला धोका आणि जबरदस्ती यांचा समावेश आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचा खून एका नियोजित कटाचा भाग होता, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. देशमुख हे गुन्हेगारी टोळीच्या खंडणीच्या मार्गात अडथळा ठरत असल्यामुळे त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या संपूर्ण कटात कराड याची भूमिका केंद्रस्थानी असल्याचे पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाले आहे. वाल्मिक कराडने दोषमुक्तीचा अर्ज सादर केला असला, तरी न्यायालयाने त्याच्या विरोधातील साक्षी, गोपनीय जबाब, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक तपासणीचे निष्कर्ष आणि महत्त्वाचे साक्षीदार यांचा विचार केला. यावरून त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

वाल्मिक कराडकडून अवादा एनर्जी प्रकल्पचालकाला धमक्या देणे यांसारखे अनेक गुन्हे आहेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळल्यानंतर, आता त्याचे वकील उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. आता या प्रकरणातील पुढची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा