राज्यातील नांदेड येथील डॉ. शंकरराव काळे शासकीय रुग्णालयातील मृतांची संख्या ३१ वर पोहल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका होताना दिसत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यानची मागणी केली आहे. याच बरोबर विरोधी पक्षातील इतर नेत्यांनी देखील या प्रकरणावरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
नांदेड येथील प्रकरणावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, या घटना गंभीर आहेत. सरकारी आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसतं. ही शिंदे सरकारची निव्वळ निष्क्रियता य़आहे. परिणामी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि जबाबदारी स्वीकारावी. ऑगस्ट महिन्यात कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तासांत १७रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत एकून ४३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारला काही देण घेण नाही. ते पक्षावर हक्क सांगण्यात आणि सत्तेच्या लालसेपोटी इतर पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. निमशहरी आणि ग्रामीण भागातील परिस्थिती दयनीय आहे. सरकारी रुग्णालये ओव्हरलोड आहेत. डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांनी संपूर्ण शहर आणि नागरिक त्रस्त आहेत. सरकारला लोकांच्या जीवनाची काळजी नाही, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली आहे.