अनिलराज रोकडे/ वसई
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण लढतील मधील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व यशोमती ठाकूर, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे योगेंद्र पवार आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर या दिग्गजांचे पराभव अनपेक्षित आणि लक्षवेधी ठरले आहेत. वेगवेगळ्या स्थानिक संदर्भानुसार या पराजयाचे विश्लेषण आणि कारणमीमांसा अनेक दिवस चालत राहणार आहे.
राज्यात उसळलेल्या महायुतीच्या लाटेत पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचे वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघातून झालेले अनुक्रमे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील या तिघांच्या पराभवापैकी अगदी निसटता झालेला हितेंद्र ठाकूर यांचा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खूपच धक्कादायक ठरला आहे. नालासोपारा आणि बोईसरच्या निकालांबद्दल काहीशी साशंकता आधीपासूनच चर्चेत होती. नालासोपारा मतदारसंघात भाजपच्या राजन नाईक यांनी ३७ हजारांचे मताधिक्य घेत, १५ वर्षे आमदार असलेल्या क्षितीज ठाकूर यांना घरी बसवले. मात्र हितेंद्र ठाकूर यांना अगदी नवख्या असलेल्या भाजपच्या स्नेहा दुबे-पंडित यांच्याकडून अवघ्या ३१५३ मतांनी मात खावी लागली. अर्थात ७४४०० मते मिळविणाऱ्या आ. ठाकूर यांना केवळ १६०० मते कमी पडली, म्हणून ३५ वर्षांच्या राजसत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे.
हा अगदीच निसटता झालेला पराभव आमदार ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून, बविआची अन्य नेते मंडळी आणि कार्यकर्ते या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. सन२०१४ सालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही आप-आपल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील वर्चस्व कायम ठेवणाऱ्या बहुजन विकास आघाडीसाठी हा पराभव चिंतेचा विषय ठरला आहे.
यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर आपले लोकप्रिय निवडणूक चिन्ह 'शिट्टी' हेच मिळविण्यात बाजी मारून बविआने सुरुवात दमदार केली होती. परंतु अचानक निवडणुकीच्या काही दिवस आधी आमदार ठाकूर यांचे ज्येष्ठ आतेबंधू, तथा बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील यांनी भाजपामध्ये जाऊन पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे बविआमध्ये मोठी चलबिचल झाली. मात्र हे संकट कौटुंबिक स्तरावर निस्तरून, अखेर पाटील यांनी बाहेर न पडता, पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला. नालासोपारा मतदारसंघातील एका बैठकीस उपस्थित राहून, तर बोईसर मतदार संघात राजेश पाटील यांच्या एका प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन बविआ मध्येच असल्याचा संकेत त्यांनी जरूर दिला. राजीव पाटील यांचे संभाव्य बंड क्षमविल्यानंतर पाटील यांच्याबद्दल सहानुभूती असलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांसाठी समाधानाची बाब ठरली असती. कदाचित यातूनही अडीच तीन हजार मतांची झीज भरून निघाली असती.
विरारमधील कॅश कांड कारणीभूत
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, निवडणुकीच्या पूर्वसंध्येला घडलेले विरार पूर्वेच्या हॉटेल विवांतामधील 'कॅश कांड' मध्ये आ. हितेंद्र ठाकूर यांनी नंतर विनोद तावडे यांना स्वतःच्या गाडीत घेऊन गर्दीतून सुरक्षित बाहेर काढून, डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न जरूर केला. परंतु त्या तीस मिनिटांत अनेक कॅमेऱ्यांनी बरेच काही टिपून झालेले होते. या प्रसंगातील अति आक्रमकता टाळता आली असती, तरी किमान वसईचा अवघ्या ३१५३ मतांसाठी ढासळलेला बुरुज सावरता आला असता, असाही एक सूर आता वसईत उमटतो आहे.