वेंगुर्ला-वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर परप्रांतीय भूमाफियांचा पुन्हा हैदोस; कांदळवन नष्ट करून जमीन बळकावण्याचे प्रकार 
महाराष्ट्र

वेंगुर्ला-वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर परप्रांतीय भूमाफियांचा पुन्हा हैदोस; कांदळवन नष्ट करून जमीन बळकावण्याचे प्रकार

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी-बागायतवाडी येथील समुद्रकिनारी परप्रांतीयांकडून जमीन खरेदी करून त्या ठिकाणी जाण्यासाठी ओहळात मातीचा भराव टाकून अनधिकृत रस्ता तयार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट उसळली असून, माजी आमदार तथा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Swapnil S

वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी-बागायतवाडी येथील समुद्रकिनारी परप्रांतीयांकडून जमीन खरेदी करून त्या ठिकाणी जाण्यासाठी ओहळात मातीचा भराव टाकून अनधिकृत रस्ता तयार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट उसळली असून, माजी आमदार तथा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, संबंधितांनी ओहळ बुजवून रस्ता तयार केल्यामुळे पावसाळ्यात ओहळाचे पाणी आता मच्छिमारांच्या घरांमध्ये घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक घरांना बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, या भागातील कांदळवनही मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वायंगणी समुद्रकिनारा हा कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध असून, अनधिकृत भरावामुळे कासव संवर्धनालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छिमारांनी आवाज उठवत माजी आमदार वैभव नाईक तसेच शासनाच्या विविध विभागांकडे तक्रारी केल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्याच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, स्थानिक आमदार दीपक केसरकर तसेच वन व कांदळवन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ग्रामस्थांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

यावेळी शिवसेना (उबाठा) वेंगुर्ले तालुकाप्रमुख निलेश चमणकर, उपतालुकाप्रमुख सुमन कामत, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, संजय गावडे, मालवण कांदळवन विभागाचे वनक्षेत्रपाल महादेव शिंगाडे, वेंगुर्ले कांदळवन विभागाचे वनपाल सुनील सावंत, वनरक्षक अजित भोसले, पोलीस पाटील स्वप्नाली मसुरकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा

अखेर ग्रामस्थांच्या दबावानंतर कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी वैभव नाईक यांनी संबंधित जागेची पाहणी करत परप्रांतीयांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच प्रशासनाने संबंधितांकडून टाकण्यात आलेला भराव तत्काळ हटवावा, अशी मागणी स्थानिक मच्छिमार आणि ग्रामस्थांनी केली. या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास स्थानिक मच्छिमारांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

कर्जमाफीची अंतिम यादी लवकरच; प्राप्तिकर भरणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतरच यादी प्रसिद्ध होणार, पहिल्या टप्प्यात २५ लाख शेतकऱ्यांची नावे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शाही खानपान; खानपानावर प्रत्येक वर्षी ९ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च

Navi Mumbai : कर्तव्य संपले... पण माणुसकी नाही; रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला जीवदान

ठाण्यातील अग्निसुरक्षा धाब्यावर; शहरातील आकडेवारीने प्रशासनाची झोप उडाली