महाराष्ट्र

सुरक्षारक्षक विदीप जाधव यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप; तरडगावसह पंचक्रोशीवर शोककळा पसरली

कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि निडर सुरक्षा रक्षक म्हणून ओळख असलेले विदीप जाधव यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र पोलीस दलाने एक समर्पित जवान गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Swapnil S

रामभाऊ जगताप / कराड

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथील सुपुत्र व महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस हवालदार विदीप दिलीप जाधव (३७) यांचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुरक्षा पथकात कार्यरत होते.

दिवंगत जाधव यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री उशिरा तरडगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तळ परिसरात झालेल्या या अंत्यसंस्कारावेळी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, ग्रामस्थ, मित्रपरिवार व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात सर्वांनी अश्रुपूर्ण निरोप दिला.

विदीप जाधव यांचा जन्म तरडगाव येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते सन २००९ मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झाले. त्यांच्या तीक्ष्ण निरीक्षणशक्ती, चाणाक्षपणा, निर्णयक्षमता आणि कर्तव्यनिष्ठेमुळे केवळ एका वर्षात त्यांची सुरक्षा पथकात निवड झाली.

२०१० साली मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती जे. ए. सानप यांचे सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात सेवा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षा पथकात कार्यरत झाले. त्यांचे वडील दिलीप जाधव हे मुंबईतील नायगाव हायस्कूलमध्ये लिपिक होते. कुटुंब मुंबईत वास्तव्यास होते. विदीप जाधव यांचा विवाह २००८ मध्ये सांगवी (ता. फलटण) येथील संध्या यांच्याशी झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले नेत्रा (१३) आणि अद्विक (८) तसेच भाऊ-बहिणी असा परिवार आहे. कर्तव्यावर असताना प्राण गमावलेल्या या धाडसी पोलीस जवानाच्या निधनाने तरडगावसह पंचक्रोशीवर शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

गाव सुन्न, डोळ्यांत अश्रू

दुर्घटनेची बातमी समजताच तरडगावमध्ये शोककळा पसरली. रात्री उशिरा पार्थिव घरी आणल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश, नातेवाईक व ग्रामस्थांची गर्दी आणि शोकमग्न वातावरण पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि निडर सुरक्षा रक्षक म्हणून ओळख असलेले विदीप जाधव यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र पोलीस दलाने एक समर्पित जवान गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कडकडीत बंद ठेवत गावकऱ्यांची श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूच्या वृत्ताने राज्यभर शोककळा पसरली असताना, त्यांच्या सुरक्षा पथकात कार्यरत असलेले फलटण तालुक्यातील तरडगाव येथील सुपुत्र विदीप दिलीप जाधव यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीने तरडगावसह संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. विदीप जाधव हे गेली अनेक वर्षे अजित पवार यांचे अंग सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. कर्तव्यावर असताना झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनाने गावातील प्रत्येकाच्या मनाला चटका बसला. कुटुंबातील एकुलता एक आधारस्तंभ हरपल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या निधनाने मित्रपरिवार व ग्रामस्थही हळहळ व्यक्त करत आहेत. शांत, मनमिळावू आणि सतत हसतमुख असलेल्या त्यांच्या स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते.

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा; ३० दिवसांची व्हिसा मुदतवाढ, ओव्हरस्टे दंडही माफ

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा

मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा