विरार : विरारमधील नारंगी रोडवरील 'रमाबाई अपार्टमेंट' या चारमजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांची संख्या १७ वर गेली असून ९ जण जखमी झाले आहेत.
वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे पथक आणि एनडीआरएफच्या पथकाकडून गेल्या २४ तासांपासून अधिक वेळ बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी आहेत.
या परिसरातील इमारती दाटीवाटीने उभ्या असल्याने तेथे मशीन्स पोहचू शकत नव्हत्या. त्यामुळे मलबा हटवण्याचे काम हाताने करावे लागले. आता मशीनच्या सहाय्याने मलबा हटवला जात आहे.
जिल्हा आपत्कालिन व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम म्हणाले की, ज्या चाळीवर इमारतीचा भाग कोसळला ती रिकामी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आता आजूबाजूच्या दुसऱ्या चाळींना रिकामी केले असून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले आहे.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी विरार (पूर्व) येथील दुर्घटनाग्रस्त रमाबाई बिल्डिंगच्या घटनास्थळी भेट दिली व जखमी झालेल्या नागरिकांची विचारपूस केली.
यावेळी त्यांच्यासोबत वसई-विरार महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, खासदार हेमंत सवरा, आमदार राजन नाईक व आमदार स्नेहा दुबे पंडित, तसेच महसूल, आरोग्य आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथे सुरू असलेल्या बचावकार्याची सविस्तर पाहणी केली.
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
विरार येथील 'रमाबाई अपार्टमेंट' दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
जखमींची नावे
प्रभाकर शिंदे, प्रमिला प्रभाकर शिंदे, प्रेरणा शिंदे, प्रदीप कदम, जयश्री कदम, मिताली परमार, संजॉय सिंग, मंथन शिंदे, विशाखा जोवील अशी जखमींची नावे आहेत.
मृतांची नावे
आरोही ओंकार जोवील, उत्कर्षा जोवील, लक्ष्मण किसक सिंग, दिनेश प्रकाश सकपाळ, सुप्रिया निवळकर, अर्णव निवळकर, पार्वती सकपाळ, दिपेश सोनी, सचिन निवळकर हरिश सिंग बिष्ट, सोनाली रुपेश तेजाम, दिपक सिंग बोहरा, कशिश पवन सहेनी, शुभांगी पवन सहेनी, गोविंद सिंग रावत, ओंकार जोवील, रोहिणी चव्हाण.