मुंबई : महाराष्ट्रातील नंदनवन अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर येथे पर्यटकांची होणारी गर्दी त्यामुळे होणारे वाहतूककोंडी, त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम रोखण्यासाठी महाबळेश्वर येथे पोलादपूर मार्गे महाबळेश्वर आणि वाई मार्गे पाचगणी महाबळेश्वर अशी रोपवे सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
महाबळेश्वर हे राज्यात नाही तर भारतातील एक अग्रगण्य थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय पर्यटन स्थळ असून दरवर्षी भारतातून लाखो पर्यटक येथे भेट देतात. या भागासाठी पर्यावरण पूरक आणि दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे खासदार वायकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी तसेच महाबळेश्वरच्या घाटरस्त्यावरील वाहतूक भार कमी करण्यासाठी आणि सुरक्षित, स्वच्छ व सुलभ प्रवासासाठी पोलादपूर मार्गे ते महाबळेश्वर आणि वाई मार्गे पाचगणी महाबळेश्वरदरम्यान रोपवे प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी वायकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाहतूककोंडीमुळे पर्यटकांना त्रास
महाबळेश्वरला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणजे आंबेनळी घाट, मेढा घाट. हे सर्व घाटमार्ग अरुंद असून, तीव्र वळणाचे आहेत, वाढत्या पर्यटक संख्येमुळे या मार्गावर विशेषत: सुट्ट्यांमुळे आणि पर्यटक हंगामात प्रचंड वाहतूककोंडी होते. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो तसेच इंधन वाया जाते. वाहनाच्या धुरामुळे येथील प्रदूषणात वाद होत आहे. या घाटांमधून प्रवास करणे पर्यटकांसाठी अनेकदा गैरसोयीचे तसेच धोकादायक ठरते.