महाराष्ट्र

मृत्यूची वाट ही कठीण; वैकुंठ धाम स्मशानभूमी मोजते अखेरची घटका

या स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याने येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे

अरविंद गुरव

जीवनाच्या रंगमंचावरील शेवट म्हणजे मृत्यू, असे म्हणतात की, मृत्यूची वाट ही कठीण असते. याचाच प्रत्यय आज पेण शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत नागरिकांना येत आहे. पेण शहरात असलेल्या भोगावती नदीकिनारी वसलेल्या वैकुंठ धाम स्मशानभूमी शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र पेणमधील नागरिक पाहत आहेत.

या स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याने येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लवकरात लवकर या स्मशानभूमीवर शेडची तसेच परिसराची डागडूजी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. स्मशानभूमीच्या आजूबाजूची झाडीझुडपे वाढल्याने जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्मशानभूमीचे पीलर खचले असून त्यांची बिकट अवस्था झाली आहे त्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

वैकुंठधाम स्मशानभूमीत आगींच्या ज्वाळांनी शेडवरील पत्रे कमकुवत झाली आहे. त्याचबरोबर काहीकाही ठिकाणी पत्र्यांना मोठमोठी छिद्रे पडल्याने पावसाळ्यात मोठी अडचण निर्माण होते. सरण रचण्याच्या स्थळी मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना सरण रचण्यास अवघड जात आहे. पिलरची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पिलरचे लोखंडी गज बाहेर आले आहेत. स्मशानभूमीवर निवारा शेडचे पत्रे संबंधित ठेकेदाराकडून व्यवस्थित न लावल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यापासून बचाव करण्यासाठी ताडपत्री, छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे, त्यानंतर अस्थी गोळा करण्यास अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात लाकडे ओली राहत आहेत त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट योग्यप्रकारे होत नसल्यामुळे परिणामी अर्धवट राहिलेल्या मृतदेहाची विटंबना होत आहे. येथील लाकडे ओली असल्याने नागरिकांना बाहेरून लाकड स्वखर्चाने विकत आणावी लागत आहेत. अस्थी ठेवण्यासाठी लॉकर्स नाहीत आणि संध्याकाळी अग्नीदान ठिकाणी लावण्यासाठी प्रकाश नसतो. स्मशानभूमीतील गैरसोयींमुळे त्रास झाल्यास त्यांचा संताप होतो. संबंधित प्रशासनाने स्मशानभूमीची योग्य देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन