महाराष्ट्र

राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा; निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक

Swapnil S

रत्नागिरी : भाजप नेते निलेश राणे गुहागर येथील तळीमध्ये होणाऱ्या सभेसाठी जात असताना चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी झालेल्या राड्यादरम्यान आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरच निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. दगडफेकीच्या घटनेनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या कणकवली दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांनी त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याच मतदारसंघात शुक्रवारी शृंगारतळी येथे जाहीर सभा आयोजित केली होती. शुक्रवारी दुपारी नीलेश राणे गुहागरकडे जाण्यासाठी कूच करत असताना ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास राणे यांच्या गाडीसह सर्व ताफा आमदार जाधव यांच्या चिपळुणातील कार्यालयासमोरून जात असताना अचानक त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांनाही काहीतरी आलबेल घडणार असल्याची शंका असल्याने त्यांनीही मोठा फौजफाटा तैनात केला होता. मोठा जमाव जमताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीत तसेच धावपळीत सात ते आठ कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एकमेकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा आणि घरांच्या खिडक्या फुटल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त