एकनाथ शिंदे  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

विकासाच्या जोरावरच सत्तेवर येऊ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास

Maharashtra assembly elections 2024 : लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राइक रेट महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपपेक्षा जास्त असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वजन वाढले आहे. लोकसभेला भाजपच्या जागा २३ वरून ९ इतक्या घटल्या. त्याउलट शिंदे गटाने कमी जागा लढवून ९ खासदार लोकसभेत पाठवले. त्यामुळे महायुतीतील महत्त्वाचा पक्ष म्हणून शिंदे गटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

Swapnil S

एस बालकृष्णन / मुंबई

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राइक रेट महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपपेक्षा जास्त असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वजन वाढले आहे. लोकसभेला भाजपच्या जागा २३ वरून ९ इतक्या घटल्या. त्याउलट शिंदे गटाने कमी जागा लढवून ९ खासदार लोकसभेत पाठवले. त्यामुळे महायुतीतील महत्त्वाचा पक्ष म्हणून शिंदे गटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘फ्री प्रेस जर्नल’ आणि दैनिक ‘नवशक्ति’शी केलेली ही बातचीत -

यंदाच्या निवडणुकीला सामोरे जाताना तुमच्या सरकारने घेतलेले तीन महत्त्वाचे निर्णय कोणते?

आम्ही लोकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्यामुळे राज्याला विकासाला गती मिळाली आहे. त्यात मुंबईतील मेट्रोचे जाळे, कोस्टल रोड, बुलेट ट्रेन प्रकल्प, आरे कारशेड, समृद्धी महामार्ग, जलशिवार योजना, अटल सेतू, वाढवण बंदर अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यातही आम्ही विमानतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा वाढवण बंदर वापरणाऱ्यांना होणार आहे. नवी मुंबई विमानतळ लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे लाखो तरुणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे. मराठवाड्यात आम्ही वॉटर ग्रिड प्रकल्पाची अंमलबजावणी केली आहे, अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सरकारचा कारभार सांभाळतानाचा तुमचा अनुभव कसा आहे?

आमच्यातील नाते सौहार्दपूर्ण असेच होते. मात्र आमचे ध्येय हे महाराष्ट्राला विकासाच्या आणि कल्याणाच्या पथावर नेणारे होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही अनुभवी नेते आहेत. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेलली शिष्यवृत्ती योजना गेमचेंजर ठरणार आहे. महिला आणि युवा तरुणांना रोजगार मिळाल्याने, महायुती सरकारच आपल्यासाठी योग्य आहे, हे त्यांनाही उमगले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू अजूनही कायम आहे, असे वाटते का? विधानसभा निवडणुकीत त्याचा कितपत फायदा होईल?

मोदींची जादू कायमच चालते. मोदी हे जागतिक नेते म्हणून उदयास आले असून त्यांना जगभर मानसन्मान मिळत आहे. २०१४ मध्ये जेव्हा त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हाच देशाला ते अभूतपूर्व अशा विकासाच्या वाटेवर घेऊन गेले. त्यांच्या कामामुळे मोदींची लोकप्रियता जगभर पसरली आहे. विरोध पक्ष मोदींबद्दल काहीही सांगत असले तरी सलग तिसऱ्यांदा ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही. मोदी हे देशातील सर्वोच्च नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यातील विधानसभेची निवडणूकही जिंकून दाखवू. महायुतीला या निवडणुकीत बहुमत मिळेल, याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही.

या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीला बसणार का?

महायुतीचे सरकारच मराठा समाजाच्या कल्याणासाठी काम करत आहे, हे त्यांना समजले आहे. आम्ही अन्य जातीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मंजूर केले आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाच्या कल्याणासाठी शिक्षणासोबतच अनेक कल्याणकारी योजना आमच्या सरकारने राबवल्या आहेत. विरोधी पक्ष फक्त मराठा समाजाबाबत फेक नरेटिव्ह पसरवत आहे.

संविधान धोक्यात असल्याचा नरेटिव्ह राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीत पसरवला होता. विधानसभा निवडणुकीतही त्याचा फटका महायुतीला बसणार का?

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या समस्त नेत्यांनी संविधानाबाबत जो नरेटिव्ह पसरवला होता तो खोटा होता, हे आता लोकांना समजले आहे. संविधानाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने दोन वेळा निवडणुकीत पराभूत केले होते. त्यामुळे राहुल गांधी यांना संविधानाबद्दल बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. राहुल गांधी तरीही खोटा इतिहास पसरवत आहेत. भारतात शीख समुदाय धोक्यात आहे, अशी चुकीची माहिती त्यांनी अमेरिकेत दिली. भारत हा देशच नाही, असे वक्तव्यही राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला लोक थारा देणार नाहीत. यंदाच्या निवडणुकीत राज्यातील जनता त्यांना त्यांची जागा निश्चितच दाखवून देतील. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, हा विश्वास आहे.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी