पोलादपूर : आगामी निवडणूक काळात सुपर वॉरियर्सना सोबत घेऊन महाड-पोलादपूरमधील सर्व निवडणुकांमध्ये आपण प्रचंड यश मिळवू, असा दृढविश्वास भाजप विधानपरिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
महाड विधानसभा १९४च्या वतीने भाजप विधानपरिषद गटनेते आणि रायगड लोकसभा क्षेत्राचे प्रभारी आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत नुकतीच सुपर वॉरियर्ससोबत बैठक पार पडली. याप्रसंगी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील, महाड १९४ विधानसभा प्रमुख बिपीन म्हामुणकर यांसह महाड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, सुपर वॉरियर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ. दरेकर म्हणाले की, मला एक खंत होती इथे काही रुजेल का? पेरले तर उगवेल का? मला आता पूर्ण खात्री आहे, या ठिकाणी भविष्यात उगवेल फक्त भारतीय जनता पार्टी, अशा प्रकारचा विश्वास देणारा हा कार्यक्रम आहे. २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहिले. ५०० वर्षाचा वनवास संपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे लोकार्पण झाले. राजकीय जीवनात मी २५-३० वर्षांपासून काम करतोय. परंतु एवढ्या वर्षाच्या काळात सर्वात राममय झालेले वातावरण यापूर्वी कधीही पाहिले नाही, अशा प्रकारचे वातावरण देशात निर्माण झाल्याचे आ. दरेकर यांनी सांगितले.
आ. दरेकर पुढे म्हणाले की, पक्ष वाढवायला वेगवेगळ्या गोष्टी लागतात त्यामध्ये वातावरण हा महत्वाचा भाग असतो. आज आपण सर्व बाजूने वरचढ आहोत. आपल्याकडे जगात लोकप्रिय असणारा नेता आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही पक्षाकडे एवढा लोकाभिमुख नेता नाही जो आपल्याकडे आहे. आपला पक्ष हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांची झोकून काम करणारी फळी ही खरी पक्षाची संपत्ती आहे आणि ती तुम्ही आहात, ते इतर पक्षाकडे नाही. आपल्याकडे प्रत्येक कार्यकर्ता वैचारिक अधिष्ठानावर उभा राहिलेला कार्यकर्ता आहे.
या सरकारच्या माध्यमातून जेवढा विकास करता येईल तेवढा निश्चितपणे आपण करणार आहोत. हे सर्व करत असताना संघटन हा महत्वाचा भाग आहे. जे काही भविष्य घडवायचे आहे ते या वॉरियर्स आणि प्रमुख लोकांच्या हातात आहे. आपल्याला वॉरियर्स का केले, आपली जबाबदार काय? हे समजून घेऊन दोन-तीन बूथचे जे काही वॉरियर्स आहेत त्यांनी त्या बूथवर आपले वर्चस्व कसे प्रस्थापित करता येईल याची काळजी घ्यावी. ज्या गावात विकासकामे करायची आहेत ती कामं आपण करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर ज्यांचा मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे, त्यासर्वांना आपल्या प्रवाहात घ्या, लाभार्थ्यांशी संवाद साधा, असे आवाहनही आ. दरेकरांनी यावेळी सुपर वॉरियर्सना केले.
पोलादपूरमध्ये जातीने लक्ष देणार
आज या ठिकाणी भाजपचा आमदार, खासदार नसला तरी माझे बारीक लक्ष महाड-पोलादपूरच्या सर्व विकासकामांकडे असणार आहे. सभागृहात मी महाड-पोलादपूरचे ५-६ विषय मांडले नाहीत असे एकही अधिवेशन गेले नाही. नुसते प्रश्न मांडले नाही तर त्या प्रश्नांची सोडवणूक देखील मी केली. २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल राज्य सरकारकडून मंजूर करून घेतले. पोलादपूर तालुक्यात आपण तालुका क्रीडा भवन उभे करतोय. येणाऱ्या काळात विकासासंदर्भात महाड,पोलादपूर, माणगावमध्ये मी स्वत: जातीने लक्ष देणार असल्याचेही आ. प्रवीण दरेकरांनी उपस्थितांना सांगितले.