यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट)
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

क्षणार्धात झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, ट्रॅक्टरजवळील व्यक्ती दूर फेकल्या गेल्या, तर...

किशोरी घायवट-उबाळे

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील ढाणकी रोडवरील किसान वेल्डिंग वर्कशॉपमध्ये ट्रॅक्टरवर वेल्डिंगचे काम सुरू असताना शनिवारी (दि. २६) सकाळी सुमारे ११ वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

ट्रॅक्टरच्या टायरजवळील हवेच्या सिलिंडरचा स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, बाळदी येथील आप्पाराव बोक्से यांच्या मालकीचा एमएच २९ व्ही २५२८ क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्लास्टिंगच्या कामासाठी वापरला जातो. ट्रॅक्टरला वेल्डिंगचे काम करण्यासाठी शनिवारी सकाळी तो किसान वेल्डिंग वर्कशॉपमध्ये आणण्यात आला होता. वेल्डिंगचे काम सुरू असतानाच ट्रॅक्टरच्या टायरजवळील हवेच्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.

क्षणार्धात झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, ट्रॅक्टरजवळील व्यक्ती दूर फेकल्या गेल्या, तर वर्कशॉप परिसरासह रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचाही फुटल्या. स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

ठिणगीमुळे स्फोटक साहित्याचा भडका उडाल्याचा संशय

प्राथमिक माहितीनुसार, हा ट्रॅक्टर ब्लास्टिंगच्या कामासाठी वापरला जात असल्याने त्यामध्ये ब्लास्टिंगसाठी लागणारे साहित्य असल्याचे सांगण्यात येत आहे. वेल्डिंगच्या कामातून उडालेली ठिणगी ट्रॅक्टरमध्ये ठेवलेल्या स्फोटक साहित्याच्या संपर्कात आल्याने स्फोट झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, ट्रॅक्टरमध्ये ब्लास्टिंगच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन काही जणांनी यापूर्वी या ट्रॅक्टरवर वेल्डिंगचे काम करण्यास नकार दिल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, एका दुकानदाराने हे काम स्वीकारल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, स्फोटादरम्यान जवळच ठेवलेल्या गॅस सिलिंडरचाही स्फोट झाल्याचे वृत्त आहे. मात्र, हवेच्या सिलिंडरचा स्फोट, स्फोटक साहित्य आणि गॅस सिलिंडर यापैकी नेमक्या कोणत्या कारणामुळे स्फोटाची तीव्रता वाढली, तसेच स्फोटांची नेमकी क्रमवारी काय होती, हे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.

दोघांचा जागीच मृत्यू

या दुर्घटनेत दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींपैकी काहींना पुढील उपचारांसाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याचे वृत्त आहे.

उमरखेड पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

ट्रॅक्टरवर वेल्डिंगचे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा खबरदारी घेण्यात आली होती का, ट्रॅक्टरमध्ये स्फोटक साहित्य होते का आणि तेथे वेल्डिंगचे काम करण्यास परवानगी होती का, याचाही तपास केला जात आहे.

या स्फोटामुळे ढाणकी रोड परिसरातील नागरिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटाचे नेमके कारण आणि या घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल

Noida Bus Fire : 'ती उतरल्यावरच मी उतरेन'; जळत्या बसमधून स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी आईसोबत थांबला, मायलेकांचा करुण अंत