मुंबई : १०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या १०० मराठी उद्योजकांचा भव्य सन्मान ‘ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद २०२६’ मध्ये करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) येथे होणाऱ्या या परिषदेसाठी १०० यशस्वी मराठी उद्योजकांची उपस्थिती निश्चित झाली आहे.
‘चला करू कर्तृत्वाचा जागर- संघर्ष, जिद्द आणि यशाचा महाउत्सव!’ या संकल्पनेवर आधारित हा सोहळा मराठी उद्योगविश्वातील कर्तृत्व, जिद्द आणि यशाचा गौरव करणारा ठरणार आहे.
उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण, निर्यात, सेवा, व्यापार आणि इतर विविध क्षेत्रांत मराठी उद्योजकांनी शेकडो कोटी रुपयांचे उद्योग उभारले आहेत. या उद्योजकांच्या यशोगाथा समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाहीत. या पार्श्वभूमीवर १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल करणाऱ्या १०० मराठी उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या कर्तृत्वाचा विशेष सन्मान करण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. मराठी माणूस उद्योग-व्यवसायात मागे आहे, या पारंपरिक समजुतीला छेद देणारी अनेक यशस्वी उदाहरणे आज महाराष्ट्रात आणि देशभरात पाहायला मिळतात. त्यांच्याच सन्मान केला जाणार आहे.
अनेक संस्थांचा समावेश
या उपक्रमात ‘मी उद्योजक होणारच’, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, मराठा बिझनेस फोरम, समृद्ध मराठी चेंबर्स, आगरी-कोळी बिझनेस क्लब, अर्थसंकेत यांसह विविध व्यावसायिक संस्था आणि नेटवर्किंग संघटना सहभागी आहेत. या कार्यक्रमात डॉ सुरेश हावरे, निलेश सांबरे, डॉ. अजित मराठे, डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, राजेंद्र सावंत, विरेंद्र पवार, संजय यादवराव, अनुप म्हात्रे, डॉ. अमित बागवे, विश्वजित देशपांडे, डॉ स्वप्नील ढसाळ, जीवन भोसले, हेमंत मोरे, भालचंद्र पाटे यांचे सहकार्य लाभत आहे. हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत, एनएसई, मुंबई येथे होणार आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे.