मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील जुन्या व धोकादायक १३ पुलांवरून श्रीगणेशाची आगमन तसेच विसर्जन मिरवणूक नेताना दक्षता बाळगण्याचे आवाहन महापालिकेने यंदाही केले आहे.
पालिका हद्दीत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १३ पूल धोकादायक स्वरुपाचे असून, काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. शिवाय, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्यामुळे गणेशभक्तांनी श्रीगणेशाचे आगमन तसेच विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. याबाबत महानगरपालिका तसेच पोलीस यांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे पूल, करी रोड रेल्वे पूल, आर्थर रोड किंवा चिंचपोकळी रेल्वे पूल, भायखळा रेल्वे पूल, शीव (सायन) स्टेशन रेल्वे पुलावरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे पूल, सँडहर्स्ट रोड रेल्वे पूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे पूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे पूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे पूल (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे पूल, प्रभादेवी–कॅरोल रेल्वे पूल आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे पूल आदींवरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुलावर गर्दी टाळा, नाचगाणी नकोत
धोकादायक १३ पुलांवर एकावेळेस अधिक वजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनिक्षेपकाचा वापर करून नाचगाणी करू नयेत. उत्सवाचा आनंद पुलावरून उतरल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळेस भाविकांची जास्त गर्दी न करता, पुलावर अधिक वेळ न थांबता पुढे जावे, पोलीस व महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार मार्गक्रमण करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.