मुंबई

BMC तील २० हजार सफाई कामगार लाभांपासून वंचित; लाड-पागे समितीच्या शिफारसी लागू करण्याची मागणी 

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सफाई कामगाराच्या व्याख्येत येत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील संबंधित खात्यांतील सर्व सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारसी लागू कराव्यात...

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सफाई कामगाराच्या व्याख्येत येत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील संबंधित खात्यांतील सर्व सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारसी लागू कराव्यात, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे. मुंबई महापालिकेच्या प्रचलित धोरणामुळे या पालिकेतील विविध खात्यांतील सुमारे १५ ते २० हजार कामगार हे सफाई कर्मचारी म्हणून देय असलेल्या लाभांपासून वंचित राहिले आहेत. 

वंचित ठेवलेल्या या कामगारांमध्ये महापालिकेच्या मलनिस्सारण, मुख्य मलनिस्सारण, बाजार खात्यातील कामगार, पालिका रुग्णालयांतील आया, वॉर्डबॉय तसेच शवविच्छेदन गृहातील कामगार, स्मशानभूमी कामगार तसेच देवनार पशुवधगृहातील कामगारांचा समावेश आहे. राज्यातील अन्य पालिकांत सफाई खाते हे आरोग्य विभागाच्या अंतर्गत येते. पण मुंबई महापालिकेत आरोग्य, घनकचरा, मलनिस्सारण, बाजार, स्मशानभूमी आदी वेगवेगळ्या खात्यांत सफाई कामगार आहेत. हे लक्षात घेता या सर्व विभागांतील कामगारांना सफाई कर्मचारी म्हणून लाभ देण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला होता. त्याला स्थगिती मिळाली होती. पण या स्थगितीबाबत सुधारित आदेश देताना ही स्थगिती काही विशिष्ट जातींना लागू होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यावर शासनाने सुधारित आदेश काढला आहे. 

या पार्श्वभूमीवर युनियनने मागणी केली आहे की, सुधारित आदेशानुसार विशिष्ट जाती-अनुसूचित जाती प्रवर्गातील सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारसी सुरू ठेवाव्यात. मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांत या प्रवर्गातील ज्या कामगारांना वंचित ठेवले आहे, त्यांनाही हे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने द्यावेत.

युनियनने मागणी केली आहे की, राज्य सरकारने ज्याप्रमाणे गिरणी कामगारांना स्वमालकीचे घर दिले आहे, त्याप्रमाणे पालिकेने घनकचरा खात्याबरोबरच मलनिस्सारण, मुख्य मलनिस्सारण, बाजार, रुग्णालयातील आया, वॉर्डबॉय, शवविच्छेदनगृहातील कामगार, स्मशानभूमी कामगार, देवनार कत्तलखान्यातील कामगार तसेच अन्य तत्सम कामगारांना मालकी हक्काचे घर द्यावे. पालिकेने सफाई कामगारांना दिलेले किंवा देणार असलेले घर सोडण्याची अट न घालता त्यांच्या कायदेशीर वारसाला पात्रतेप्रमाणे पालिकेत अग्रहक्काने नोकरी द्यावी. 

सफाई कर्मचारी कोण?

राज्य सफाई कामगार अधिनियमानुसार सफाई कर्मचारी म्हणजे कोण हे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार कोणतेही स्वच्छतेचे कामकाज करणारी किंवा त्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती तसेच मानवी विष्ठा वाहून नेणारी कोणतीही व्यक्ती ही सफाई कामगार आहे. मुंबई महापालिकेने मात्र लाड समितीच्या शिफारसीनुसार देय असलेला वारसा हक्क, नोकरीचा हक्क हा काही विशिष्ट कामगारांना लागू केला आहे. सफाईचे काम करणाऱ्या बहुसंख्य कामगारांना तसेच त्यांच्या वारसांना यापासून वंचित ठेवले आहे, अशी तक्रार युनियनने पत्राद्वारे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी