मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये १९ वर्षांपूर्वी ११ जुलै २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या सर्व १२ आरोपींची आज (२१ जुलै) मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपींना अमरावती, नागपूर, नाशिक आणि पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. २०१५ मध्ये विशेष मकोका न्यायालयाने या १२ आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. निर्दोष ठरवलेल्या १२ पैकी एका आरोपीचा याआधीच मृत्यू झाला असल्याने आता ११ जणांची मुक्तता होणार आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये १८९ जण मृत्युमुखी पडले होते, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.
न्यायालयाचे निरीक्षण : सबळ पुरावा नाही, कबुली अमान्य
विशेष मकोका न्यायालयाचा ३० सप्टेंबर २०१५ रोजीचा निकाल बाजूला ठेवताना, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने म्हटले की, दोषारोप सिद्ध करण्यास कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे दोषी ठरवलेला निकाल मान्य करता येत नाही. "अभियोग पक्ष आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात पूर्णतः अपयशी ठरला आहे. कोणताही सबळ पुरावा नसताना आरोपींनीच हा गुन्हा केला आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्धचा दोषारोप रद्द करण्यात येत आहे," असे न्यायमूर्तींच्या खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, जर अन्य कोणत्याही प्रकरणात आरोपींची गरज नसेल तर त्यांची तुरुंगातून त्वरित मुक्तता करण्यात यावी, असेही कोर्टाने निर्देश दिले. बॉम्बस्फोटासाठी कोणत्या प्रकारचे स्फोटक वापरण्यात आले होते हे अभियोग पक्ष स्पष्ट करू शकला नाही. आरोपींकडून घेतलेल्या कबुलीपत्रांची वैधता न्यायालयीन कसोटीवर अपयशी ठरली. तसेच कबुली देण्यापूर्वी आरोपींवर अत्याचार झाल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवादही न्यायालयाने मान्य केला. ओळख परेड योग्य अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत झाल्यामुळे तीही उच्च न्यायालयाने अमान्य ठरवली. त्याचप्रमाणे, खटल्यादरम्यान आरोपींची ओळख पटवणाऱ्या साक्षीदारांचे जबाबही विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
११ मिनिटांत ७ साखळी बॉम्बस्फोट
११ जुलै २००६ रोजी मुंबईतील विविध लोकल ट्रेनमध्ये अवघ्या ११ मिनिटांत सात साखळी बाँबस्फोट झाले होते. या स्फोटांसाठी प्रेशर कुकरमध्ये स्फोटके लपवण्यात आली होती. पहिला स्फोट संध्याकाळी ६.२४ वाजता तर शेवटचा स्फोट ६.३५ वाजता झाला. हे बाँम्ब चर्चगेटहून सुटणाऱ्या लोकल गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये ठेवण्यात आले होते. हे स्फोट माटुंगा रोड, माहिम जंक्शन, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, भायंदर आणि बोरिवली स्थानकाजवळ झाले होते.
विशेष मकोका न्यायालयाने फैजल शेख, आसिफ खान, कमाल अन्सारी, एहतिशाम सिद्दिकी आणि नावेद खान यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर मोहम्मद साजिद अन्सारी, मोहम्मद अली, डॉ. तन्वीर अन्सारी, माजिद शफी, मुझम्मिल शेख, सुहेल शेख आणि जमीर शेख या सात जणांना कटात सामील असल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यापैकी कमाल अन्सारीचा कोरोनाची लागण झाल्यामुळे नागपूर कारागृहात मृत्यू झाला होता. आता उर्वरीत ११ जणांची सुटका होणार आहे.