एस. बालकृष्णन / मुंबई
पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईत रक्तपात घडवून १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यात १७५ जण ठार झाले आणि ३०० जखमी झाले. हा संपूर्ण हल्ला पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या (आयएसआय) ‘एस’ शाखेने घडवला यात कोणताही संशय नाही.
काश्मीरच्या पलीकडे दहशत पसरवण्याचा त्यांचा उद्देश होता. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तयार केलेल्या ६९ पानी अहवालात ‘आयएसआय’च्या सक्रिय भूमिकेचे ठोस पुरावे दिले आहेत. ‘आयएसआय’ने आपल्या प्रॉक्सी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या मार्फत हा कट रचला होता आणि ही संघटना ओसामा बिन लादेनच्या अल-कायदाशी जवळून संलग्न होती.
ब्रिटिश तपास पत्रकार कॅथी स्कॉट-क्लार्क आणि ॲड्रियन लेव्ही यांनी ‘द एक्साईल’ या पुस्तकात लिहिले आहे :
‘२००८ मध्ये, लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याचे दोन माजी सहकाऱ्यांच्या मते, ओसामा बिन लादेन हा (मानसहेरा, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एक शहर) येथे मुंबई हल्ल्याचा कट आखणाऱ्या खास बैठकीला उपस्थित होता…. ही बैठक ‘लष्कर’ने आयोजित केली होती, ‘आयएसआय’च्या ‘एस’-विंगने तिच्यावर देखरेख ठेवली होती आणि अल-कायदाने त्याला प्रायोजित केले होते.’
अमेरिकी कमांडो कारवाईनंतर मिळालेल्या दस्तावेजांवरून असे दिसते की, हाफिज सईद हा ओसामा-बिन-लादेनच्या मृत्यूपर्यंत संपर्कात होता.
३ ऑगस्ट २०१५ रोजी पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे माजी महासंचालक तारिक खोसा यांनी कराचीच्या ‘डॉन’मध्ये प्रकाशित लेखात कबूल केले की, मुंबईवर हल्ला करणारे दहा दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाचे सदस्य होते. तसेच त्यांना सिंध प्रांतातील छावणीत प्रशिक्षण दिल्याचे न्यायवैज्ञक पुरावे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, आजतागायत पाकिस्तानने लष्कर आणि त्याचे हँडलर्स मेजर इक्बाल, साजिद मजीद आणि इतर- यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
पाकिस्तान हा त्यांना ‘गैरराज्य घटक’ म्हणते. परंतु वास्तविकतेत हे सर्वजण प्रशिक्षित, प्रायोजित आणि २६/११ चा दहशतवादी कट राबवण्यासाठी नियुक्त केलेले दहशतवादी होते, असे आढळले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, १९९३ च्या मुंबई साखळी स्फोटांमध्ये सहभागी असलेला दाऊद इब्राहिमचा टोळीने २००८ च्या हल्ल्यातही ‘लष्कर’शी हातमिळवणी केली होती. बंदर परिसरात मादक पदार्थ, डिझेल आणि इतर मालाची तस्करी करणारे दाऊदचे गुंड कसाब आणि त्याच्या साथीदारांना भारतीय तटरक्षकांच्या गस्तीपासून वाचवत कुलाब्यातील बधवार पार्कसमोरील मच्छीमार कॉलनीत अचूक ठिकाणी उतरवण्यासाठी मदत करत होते. त्यानंतर स्थानिक सहकाऱ्यांनी त्यांना कॅफे लिओपोल्ड, छबाड हाऊस, ताज हॉटेल, सीएसटी स्टेशन आणि इतर लक्ष्यांपर्यंत पोहोचवले.
दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी केलेले समन्वित, जोरदार हल्ले हे फक्त डेव्हिड हेडलीने केलेल्या रेकीमुळे शक्य झाले असे नाही. त्यांना मोठ्या प्रमाणात स्थानिक मदत मिळाल्याचे त्या रात्रीच्या घटनांवरून स्पष्ट होते.
स्थानिकांच्या मदतीचा तपास नाही
यामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो, कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईतल्या मदतीशिवाय एवढी मोठी, अचूक योजना आखलेली कारवाई कशी केली असेल? दुर्दैवाने हा पैलू पूर्णपणे तपासला गेला नाही.
पूनम अपराज/मुंबई
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला सतरा वर्षे उलटून गेली असली तरी जखमा आजही ताज्याच आहेत. दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नौदल, तटरक्षक दल आणि मरीन पोलीस यांच्या तिहेरी सुरक्षा कवचाला भेदून समुद्रामार्गे मुंबईत प्रवेश केला. त्यानंतर शहराने त्याच्या इतिहासातील सर्वात काळोखी रात्र अनुभवली.
या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणारे माजी तपास अधिकारी रमेश महाले म्हणाले की, हल्ल्याचा पहिला कॉल येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्हाला नरिमन पॉइंटला तैनात करण्यात आले. त्यावेळी सह आयुक्त राकेश मारिया हे नियंत्रण कक्षातून संपूर्ण कारवाईचे समन्वय करत होते.
मारिया सरांनी गिरगाव चौपाटीवर पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना डोळ्यावर पट्टी बांधून नायर रुग्णालयात घेऊन जाण्याचे आदेश दिले.रात्री १२.११ वाजता माहिती मिळाली की, दहशतवादी विधान भवनाजवळून स्कोडा कार पळवून मलबार हिलकडे गेले आहेत. रात्री १२.३० वाजता गिरगाव चौपाटीजवळ गाडी अडवण्यात आली. आम्ही टीमला हेडलाईट बंद ठेवून फक्त कॅबिन लाईट लावण्याच्या सूचना दिल्या होत्या, पण इस्माईलने ‘अप्पर लाईट’ मारली, ज्यामुळे पोलीस क्षणभर दिपले. कार डिव्हायडरवर आदळली आणि थांबली. संतापलेल्या इस्माईलने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि तो ठार झाला. बाहेर उभ्या अधिकाऱ्यांना मात्र लगेच माहिती नव्हती की तो ठार झाला आहे.
इस्माईल ठार झाल्यानंतर संतापलेला कसाब गाडीतून उतरला, पण तोल जाऊन पडला. त्याच वेळी एएसआय तुकाराम ओंबळे यांनी त्याला ‘एके-४७’ रायफलसह पाहिले आणि एकदम धाव घेऊन त्याला मिठी मारली. कसाबने ओंबळे यांच्या पोटात पाच गोळ्या झाडल्या; त्यापैकी चार त्यांच्या मानेजवळून बाहेर गेल्या आणि एक त्यांच्या खिशातील नाण्यावर आपटली. हेच नाणे नंतर न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात आले.
गंभीर जखमी असूनही ओंबळे यांनी पकड सोडली नाही. त्यांच्या बलिदानामुळे फक्त ७ मिनिटांत कसाबला जिवंत पकडणे शक्य झाले.”
साहेब ! तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो
महाले सांगतात, ‘प्रारंभीच्या चौकशीत कसाबने सांगितले की कट पाकिस्तानमध्ये रचला गेला होता. त्यामुळे मृत्यूची भीती नसलेल्या व्यक्तीकडून कबुली मिळवणे मोठे आव्हान होते. सुरुवातीला तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. नंतर बोलायला लागल्यावर तो म्हणाला की, ‘साहेब, ८ वर्षे झाली. तुम्ही अफजल गुरूला फाशी देऊ शकला नाहीत. आता मोजायला सुरू करा… भारत कोणालाही फाशी देऊ शकत नाही. पण चार वर्षे आणि सात दिवसांनी कसाबला फाशी देण्यात आली. त्याला समजल्यावर तो म्हणाला: ‘साहेब, तुम्ही जिंकलात, मी हरलो.’ हे शब्द माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील.’