मुंबई : श्रीगणेशोत्सवाच्या कालावधीत विविध ठिकाणी झालेल्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर निर्माण होणाऱ्या मूर्ती साहित्याचे पर्यावरणपूरक पद्धतीने संकलन, वाहतूक व तात्पुरते साठवण करण्याची कार्यवाही मुंबई महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आली. श्रीगणेशोत्सव दरम्यान १६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण २ हजार ७५४.८५ मेट्रिक टन विसर्जनोत्तर मूर्ती साहित्याचे संकलन करण्यात आले असून, त्यासाठी ७०७ वाहन फेऱ्यांद्वारे हे साहित्य निर्धारित तात्पुरत्या मुलुंड येथील साठवणूक केंद्रापर्यंत वाहून नेण्यात आले आहे. पुढील टप्प्यात या साहित्याच्या वैज्ञानिक, पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापर, पुनर्चक्रण अथवा पुनर्प्रक्रियेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) तज्ज्ञ समितीच्या शिफारशींचे पालन करत विसर्जनानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) आधारित मूर्ती साहित्य तलावात कायमस्वरूपी राहू नये, यासाठी त्याचे संकलन करून पर्यावरणपूरक पद्धतीने तात्पुरते साठवण व पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेने या अनुषंगाने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली होती. या पार्श्वभूमीवर, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली गणेशोत्सवानिमित्त निर्माल्य तसेच विसर्जनोत्तर मूर्ती साहित्याच्या संकलन व वाहतुकीसाठी उपाययोजना करण्यात आल्या.
जलगुणवत्तेवर परिणाम पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तीप्रमाणे पीओपी पाण्यात नैसर्गिकरीत्या विरघळत नाही. त्यामुळे हे साहित्य कृत्रिम तलावांमध्ये तसेच राहिल्यास किंवा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गेल्यास जलगुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते तसेच मूर्तींचे अवशेष पुन्हा जलस्रोतांमध्ये किंवा समुद्रकिनाऱ्यावर आढळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
१३१ वाहन फेऱ्याद्वारे ५१० मेट्रिक टन निर्माल्य संकलित!
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने २६ सप्टेंबर रोजी निर्माल्य आणि विसर्जनोत्तर मूर्ती साहित्याची सर्वाधिक वाहतूक करण्यात आली. या दिवशी १३१ वाहन फेऱ्यांद्वारे ५१०.९२ मेट्रिक टन निर्माल्य आणि साहित्य संकलित करण्यात आले.
या भागातून अधिक साहित्य संकलन
परिमंडळनिहाय संकलित साहित्यामध्ये के/पश्चिम विभागातून ३१४.८२ मेट्रिक टन, एस विभागातून २५३.५८ मेट्रिक टन आणि डी विभागातून २४९.४३ मेट्रिक टन साहित्याचा समावेश आहे.
संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख
महानगरपालिकेच्या विभागनिहाय (वॉर्ड) पथकांमार्फत विसर्जित मूर्ती व त्यांचे अवशेष संकलित करण्यात आले. संकलित साहित्याच्या वाहतुकीसाठी स्वच्छ व झाकलेल्या वाहनांचा वापर करण्यात आला. प्रत्येक वाहनाचे वजन वजनकाट्यावर करून त्याची नोंद घेण्यात आली. तसेच विभागनिहाय संकलित साहित्याची नोंद, छायाचित्रे, व्हिडिओ तसेच दैनंदिन प्रगती अहवाल जतन करण्यात आले आहेत. यामुळे संकलनापासून तात्पुरत्या साठवणूक केंद्रापर्यंतच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यात आली.