मुंबई

काळबादेवीतील चार कोटीच्या रॉबरीचा ३० तासांत पर्दाफाश

हा प्रकार नंतर उघडकीस येताच एल. टी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

नवशक्ती Web Desk

मुंबई : काळबादेवी परिसरात झालेल्या चार कोटी रुपयांच्या रॉबरीच्या अवघ्या तीस तासांत एल. टी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश करुन गुजरातला पळून गेलेल्या सहाही आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून चोरीची सर्व रोख रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. हर्षद चेतनजी ठाकूर, राजूबा प्रल्हादसिंग वाघेला, अशोकभा जेठुबा वाघेला, चरणभा नथुबा वाघेलर, मेहुलसिंग जेसुबा ढाबी आणि चिरागजी गलाबजी ठाकूर अशी या सहा जणांची नावे असून ते सर्वजण गुजरातचे रहिवाशी आहेत. काळबादेवी येथे केडीएम इंटरप्रायजेस कंपनीच्या कार्यालयात चार तरुण घुसले. काही कळण्यापूर्वीच या चौघांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून कार्यालयातील ४ कोटी ३ लाख रुपयांची कॅश पळवून नेली होती. हा प्रकार नंतर उघडकीस येताच एल. टी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी रॉबरीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांतील आरोपी मुंबईहून गुजरातला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी दोन ते तीन पथकाने गुजरातच्या विविध ठिकाणी कारवाई करुन सहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत सहाही आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. त्यांनतर त्यांना अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. या आरोपींकडून पोलिसांनी चार कोटी तीन लाखांची संपूर्ण कॅश जप्त केली आहे.

अटक केलेले सर्व आरोपी गुजरातच्या पाटणचे रहिवाशी आहे. हर्षद हा मजुरीचे काम करतो तर राजूबा, अशोकभा, चरणभा मेहुलसिंग, चिरागजी हे चालक म्हणून कामाला आहेत. या सर्वांनी कट रचून या कार्यालयात रॉबरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीस तासांत सहाही आरोपींना चोरीच्या सर्व मुद्देमालासह अटक करण्यात आल्याने वरिष्ठांनी संबंधित पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

विरोधकांच्या टीकेनंतर केंद्र सरकारचा निर्णय : ‘संचार साथी’ ॲपची सक्ती नाही, प्री-इन्स्टॉल करण्याचा निर्णय मागे!

रोहित पवारांनी अजित पवारांच्या भूमिकेचं केलं स्वागत, पण फडणवीसांवर टीका; म्हणाले - "एकीकडं ठेकेदारांचं बिऱ्हाड..."

महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेची विशेष व्यवस्था; १२ अतिरिक्त गाड्यांची घोषणा, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

मुंबई-पुणे सोडून थेट बहरीन! जय पवार-ऋतुजा पाटील यांचं शाही लग्न; ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी ४०० पाहुण्यांमध्ये NCP चे केवळ २ नेते

"आता कोण गप्प आहे?" रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीनंतर विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल