मुंबई : सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्यावतीने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. १५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा कुलाबा येथील २ दशलक्ष लिटर क्षमतेचा एसटीपी प्रकल्प तसेच सांडपाणी निर्जंतुक करून आणि त्याचा पुनर्वापर करण्यासाठीचा प्रकल्प सज्ज असल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच निर्जंतुकिकरण केलेल्या ५० टक्के पाण्याचा भविष्यात पिण्यासाठी वापर होऊ शकेल, असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मुंबई शहरातील लोकसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नागरिकांच्या तुलनेत पाणी पुरवठा होत नाही. यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन तसेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबईत दररोज २१९० एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यापैकी केवळ २२.६५ एमएलडी पाणी म्हणजेच एक टक्के पाण्याचा पुनर्वापर केला जातो. बाकीचे पाणी सांडपाण्याच्या माध्यमातून समुद्रात सोडण्यात येते. यामुळे समुद्री जीवांना धोका निर्माण होतो. तसेच पाण्याचा पुनर्वापर होत नाही. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने २०२३ साली हजारो कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्रकल्प उभारण्यात आला होता. या अंतर्गत दररोज २४६४ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
२४६४ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणार
हा प्रस्तावित प्रकल्प २०२६, २०२७ आणि २०२८ ला सुरू होण्याची शक्यता आहे. तर भांडुप येथे २१५ एमएलडी, घाटकोपर येथे ३३७ एमएलडी, वांद्रे येथे ३६० एमएलडी, वरळी येथे ५०० एमएलडी, धारावी येथे ४१८ एमएलडी, मालाड येथे ४५४ एमएलडी, तर वर्सोवा येथे १८० एमएलडी सांडपाण्यावर म्हणजेच एकूण २४६४ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. हे पाणी दैनंदिन जीवनातील बागकाम, घरकाम, रस्ते धुणे, वाहने धुणे, तसेच अग्निशमन दलाच्या उपयोगासाठी वापरले जाऊ शकते. या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र कंत्राटातील रक्कम गरजेनुसार वाढू शकते, अशी माहिती पालिकेचे मलनिःसारण प्रकल्प प्रमुख अभियंता राजेश ताम्हाणे यांनी दिली.
मुंबईत सुरू होणारे प्रकल्पांचे ठिकाण व तारीख
भांडुप, घाटकोपर, वर्सोवा-जुलै २०२६
वरळी, धारावी, वांद्रे -२०२७
मालाड -२०२८