मुंबई : अंधेरीतील एका व्यावसायिकाला शेअर मार्केटच्या गुंतवणकीवर चांगला परतावा देतो असे सांगून अकरा कोटींना गंडा घालणाऱ्या एका आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. आशिष दिनेशकुमार शहा असे या आरोपीचे नाव असून, गेल्या दोन महिन्यांपासून आशिष हा फरार होता. अखेर त्याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १.६७ कोटीचे विविध सोन्याचे दागिने आणि कॅश, असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आशिषने आतापर्यंत पाचशेहून अधिक लोकांची दोनशे कोटीची फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यातील तक्रारदार व्यावसायिक असून, ते अंधेरी परिसरात राहतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांची आशिष शहासोबत ओळख झाली होती. या ओळखीत त्याने त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून शेअर मार्केटमध्ये सुमारे अकरा कोटीची गुंतवणूक केली होती; मात्र कुठलाही परतावा तसेच मूळ रक्कम न देता आशिष शहा हा पळून गेला होता. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आशिषविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आरोपी फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.