मुंबई

महिलेच्या पोटातून काढला ५ किलो वजनाचा ट्यूमर; पालिकेच्या देसाई रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

उपनगरीय रुग्णालयात सुरू करण्‍यात आलेल्‍या 'डीएनबी' अभ्यासक्रमामुळे व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये अशाप्रकारची आव्हानात्मक शस्त्रक्रिया करता

Swapnil S

मुंबई : पोटात दुखणं, गोळा येणं यामुळे त्रस्त महिला सांताक्रुझ येथील पालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयत उपचारासाठी दाखल झाली. तिची तपासणी केली असता पोटात ट्यूमर आढळला. रुग्णालयातील वैद्यकीय टीमने दुर्मिळ, अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. महिलेच्या पोटातून तब्बल ५ किलो वजनाचा ट्यूमर काढला आणि महिलेची वेदनातून सुटका केली.

पोटाचा वाढता आकार, श्वास घेण्यास त्रास व दैनंदिन जीवनात अति थकवा या तक्रारींमुळे २६ वर्षीय महिला त्रस्त होती. तिच्या पोटात सतत दुखत होते. तिचे वजन असाधारणपणे वाढत होते. या महिलेचा दोन वेळा गर्भपात झाला होता. त्यानंतर यशस्वी गर्भधारणा व प्रसूती होऊन मूल झाले. त्यानंतर पोटदुखी होऊ लागल्याने या महिलेने वेळोवेळी स्थानिक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. मात्र खासगी रुग्णालयातील महागडा खर्च आणि त्रास कमी होत नसल्याने महिलेला व्‍ही. एन. देसाई रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व्ही. एन. देसाई सर्वसाधारण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक (प्रभारी) डॉ. हरबन्‍ससिंग बावा यांच्या सूचनेनुसार स्त्रीरोग विभागातील वैद्यकीय तज्ज्ञांनी या रुग्ण महिलेची समस्या जाणून घेतल्यानंतर अचूक निदान होण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत महिलेच्या ओटीपोटाजवळ अंदाजे २१ सेंटीमीटर बाय २० सेंटीमीटर आकाराचा गोळा दिसत होता. एमआरआय तपासणीत महिलेच्‍या पोटात उजव्या भागात एक गळू (सिस्ट) आढळून आला. त्‍याला वैद्यकीय परिभाषेत 'मुसिनस सिस्टॲडेनोमा' म्हणतात. जगभरात बीजकोशाच्या गाठींपैकी केवळ १५ टक्के 'मुसिनस सिस्टॲडेनोमा' असतात. सिटी स्कॅन, सोनोग्राफी आदी अहवाल प्राप्त झाल्यानंतर, एकूणच स्थिती लक्षात घेता या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. ललिता मायादेव, डॉ. श्वेता काशीकर, डॉ. डोलोमनी आणि डॉ. निकिता यांच्या पथकाने निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्‍या बीजकोशातून २४ सेटीमीटर बाय २३ सेंटीमीटर आकाराचा अनेक कप्पे असलेला मांसल गोळा अर्थात ट्यूमर काढण्यात आला. या ट्यूमरचे अंदाजे वजन ५ किलो एवढे होते. त्या अंतर्गत २.५ लिटर एवढे 'मुसिनस' द्रव होते. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या वेदना दूर झाल्या..

डीएनबी अभ्यासक्रमामुळे शक्य!

उपनगरीय रुग्णालयात सुरू करण्‍यात आलेल्‍या 'डीएनबी' अभ्यासक्रमामुळे व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये अशाप्रकारची आव्हानात्मक शस्त्रक्रिया करता आली. डीएनबीच्या माध्यमातून तसेच अद्ययावत यंत्रणेच्या मदतीने उपनगरीय रुग्णालयांमध्ये जटिल आणि पूर्वी कधीही न केलेल्या अशा अवघड स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करणे देखील आता शक्य होत आहे, असे देसाई रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. ललिता मायादेव म्हणाल्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी