प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

दक्षिण मुंबईत ७० इमारती अतिधोकादायक; म्हाडा देणार इमारत रिकामी करण्याची नोटीस: ५०० इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रर्रचना मंडळाच्या अखत्यारित असलेल्या दक्षिण मुंबईतील तब्बल ७० उपकर प्राप्त इमारती अति धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

तेजस वाघमारे : मुंबई

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रर्रचना मंडळाच्या अखत्यारित असलेल्या दक्षिण मुंबईतील तब्बल ७० उपकर प्राप्त इमारती अति धोकादायक असल्याचे समोर आले आहे. मंडळामार्फत सुरू असलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून ही माहिती समोर आली आहे. अति धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना लवकरच घरे खाली करण्याच्या नोटिसा मंडळामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दक्षिण मुंबईमध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे अ ते ग विभाग आहेत. या विभागांमध्ये एकूण १९ हजार ६४२ उपकरप्राप्त इमारती होत्या. यामध्ये १६ हजार ५०२ इमारती या १ सप्टेंबर १९४० पूर्वी बांधलेल्या आहेत.  यामधील काही इमारती कोसळल्याने तर काही अत्यंत मोडकळीस आल्याने तोडण्यात आल्या आहेत. तर काही इमारतींचा पुनर्विकास झाल्याने तसेच काही इमारती उपकरातून वगळल्यामुळे सध्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या १३ हजार ९१ एवढी आहे.

बहुतांश इमारती या शंभर वर्षांहून जुन्या असल्याने त्या जीर्ण आणि मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे मंडळामार्फत दरवर्षी पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात येते. सर्वेक्षणात अति धोकादायक आढळणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठविण्यात येते. तसेच पावसाळ्यात इमारत कोसळण्याच्या दुर्घटना ही घडतात. या पार्श्वभूमीवर यंदा मंडळाने सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंडळाच्या पॅनलवर असलेले स्ट्रक्चरल ऑडिटरकडून हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. आजवर दक्षिण मुंबईतील ५०० इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये तब्बल ७० इमारती या अति धोकादायक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या इमारतींमधील शेकडो कुटुंबांना घरे खाली करण्याच्या नोटिसा मंडळामार्फत देण्यात येणार असल्याचे, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.

आजवर ५०० इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण झाले आहे. तर उर्वरित इमारतींचे ऑडिट करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

३६ हजार ३८६ रहिवाशांचे पुनर्वसन

मंडळामार्फत आजपर्यंत ९४१ जुन्या उपकर प्राप्त इमारती पुनर्रचित करण्यात आल्या आहेत. त्याजागी नवीन ४५४ पुनर्रचित इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत ३३ हजार ९५४ निवासी २ हजार ४३२ अनिवासी असे ३६ हजार ३८६ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

४ हजार ४८८ इमारतीची कामे प्रगतिपथावर

मंडळातर्फे जुन्या उपकर प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासासाठी खासगी विकासकांना अद्यापपर्यंत २ हजार ५४२ ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. त्यामध्ये ४ हजार ४८८ उपकरप्राप्त इमारतीचा समावेश असून ८४ हजार ९५९ रहिवाशांचा समावेश आहे. आतापर्यंत १००४ योजनांचे काम पूर्ण झाले असून १६८१ जुन्या उपकरप्राप्त इमारतीमधील २८३७८ रहिवाशांचे पुनर्वसन झालेले आहे.

संक्रमण शिबिरांचा प्रश्न

अतिधोकादायक जाहीर होणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात म्हाडाच्या संक्रमण शिबिरात पाठविण्यात येते. मात्र मंडळाकडे मुंबईत संक्रमण गाळे उपलब्ध नसल्याने या रहिवाशांना पर्यायी घरे देण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. उपनगरात संक्रमण शिबिरे उपलब्ध आहेत. मात्र त्याठिकाणी जाण्यास शहरातील लोक विरोध करत असल्याने रहिवाशांचे पुनर्वसन करताना मंडळाला अनेक अडचणींना सामोरे जावे लावणार आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री