मुंबई : नागपाडा, सिद्धार्थ नगर येथील बीएमसी कॉलनीत इमारतीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पाण्याची टाकी बुधवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास फुटली. या दुर्घटनेत खुशी खातून (९) या मुलीचा मृत्यू झाला, तर ३ जण जखमी झाले असून जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नागपाडा सिद्धार्थ नगर, कामाठीपुरा लेन नंबर १ येथे पालिकेची कॉलनी असून आश्रय योजनेंतर्गत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास आरसीसी पाण्याच्या टाकीचा ब्लास्ट झाला. या घटनेत खुशी खातून (९) या मुलीचा मृत्यू झाला. तर मिरज खातून (९), गुलाम रसूल (३२) व नाजीरा (३३) हे तिघे जखमी झाले असून त्यांना फौजीया या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिघा जखमीची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेप्रकरणी स्थानिक पोलीस, पालिकेचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.